Aditya Raj Kapoor Graduate: शिक्षण घेण्याचा निर्णय तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घेऊ शकता, असं म्हटलं जातं. अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) हे वयाच्या 67 व्या वर्षी पदवीधर झाले आहेत. आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आदित्य हे बिझनसमॅन असून ते गोव्यात राहतात. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे खूप उशिरा कळले. त्यानंतर त्यांची मुलगी तुलसीने त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी शिक्षण घेतले.
आदित्य यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तत्त्वज्ञान (Philosophy) या विषयात पदवी घेतली आहे. ते म्हणाले- 'मला अभ्यासाची संधी मिळत होती पण मी त्याकडे पाहिलं नाही. मला माझी चूक कळली पण ते पुरेसे नव्हते, तेव्हाच मला शिक्षणाचे महत्त्व कळले.'
काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्या हातात एक सर्टिफिकेट दिसत आहे. त्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी आदित्य यांना शुभेच्छा दिल्या.
आदित्य यांनी सांगितले की, 'दोन आठवड्यांपूर्वी मी 59.67 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. मी फिलॉसॉफी ऑनर्समध्ये सेकंड क्लासनं उत्तीर्ण झालो. इग्नूने खूप सहकार्य केले. गोव्यात त्यांच रिजनल डायरेक्टर आहेत. ते खूप हेल्पफुल आहेत. माझ्या या यशाने माझे कुटुंब खूप आनंदी आणि उत्साहित झाले. मी माझी आई गीता बाली यांच्यासाठी हे केले आहे. हा सर्व माझ्या गुरूंचा प्रभाव आहे. माझे गुरु - भोले बाबा.'
आदित्य यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की, 'गेली अनेक वर्षे जगण्याच्या माझ्या संघर्षात मला 'माणसाचा विचार' या विषयानं नेहमीच भुरळ घातली. माणूस जसा विचार करतो तसा विचार का करतो? त्याला काय विचार करायला लावते? हा आणि माझा आध्यात्मिक अनुभव या सर्व गोष्टींचा मी विचार केला.'
इतर महत्वाच्या बातम्या:
आपल्या नृत्यशैलीने अवघ्या बॉलिवूड विश्वाची दिशा बदलणारे शम्मी कपूर! वाचा अभिनेत्याबद्दल...