Shammi Kapoor : ‘चाहे कोई मुझे जंगली कहे....’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा आज स्मृतिदिन. शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केले होते. शम्मी कपूर यांनी आपल्या नृत्य शैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत नवा बदल घडवून आणला. शम्मी यांना बॉलिवूडचा ‘एल्विस प्रिस्ले’ म्हटले जायचे. चित्रपटाचा नायक केवळ झाडाची फांदी धरूनच झुलत नाही तर, तो स्वत:ही नाचू शकतो, हे त्यांनी आपल्या चित्रपटांमधून दाखवून दिले होते. त्यांच्यापासून प्रेरित होऊ नंतर इतर कलाकारांनीही चित्रपटांमध्ये नृत्य करण्यास सुरुवात केली.


कपूर घराण्याच्या अनेक पिढ्या इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे राज्य करत आहेत. मात्र, याच घराण्यातील अभिनेते शम्मी कपूर यांनी इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली. ज्या काळात चित्रपटांमध्ये गंभीर आणि रोमँटिक नायकांना प्राधान्य दिले जात होते, त्या काळात शम्मी यांनी आपली नखरेल नटखट शैली, उत्साह यातून नायिकेने प्रियकराची एक नवीन प्रतिमा तयार केली.


50हून अधिक चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून केले काम!


शम्मी कपूर यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे नाव होते 'जीवन ज्योती'. शम्मी कपूर यांनी मुख्य अभिनेता म्हणून 50हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि 20हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत. ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. शम्मी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'रॉकस्टार' हा त्यांचा नातू रणबीर कपूरसोबतचा चित्रपट होता.


पहिल्याच चित्रपटाने मिळाली प्रेक्षकांची वाहवा...


अभिनेते शम्मी कपूर यांचे खरे नाव शमशेर राज कपूर होते. परंतु, कपूर कुटुंबात हाक मारण्यासाठी एक वेगळे नाव ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांचे नावही समशेरवरून बदलून शम्मी असे करण्यात आले. त्यांना शम्मी नावानेच अभिनेता म्हणून लॉन्च करण्यात आले. 1948मध्ये शम्मी कपूर यांनी आपल्या वडिलांसोबत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. चार वर्षे त्यांनी हे काम केले. यासाठी त्यांना दरमहा दीडशे रुपये मिळायचे. 1953 मध्ये शम्मी कपूर यांनी ‘जीवन ज्योती’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. या चित्रपटातील अभिनेत्री चांद उस्मानीसोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली होती.


यामुळेही राहिले चर्चेत!


1955 मध्ये शम्मी कपूर यांनी गीता बालीशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना कांचन आणि मिकी ही दोन मुले झाली. मात्र, त्यांच्या पत्नीचे 1960 मध्ये निधन झाले. यानंतर 1969मध्ये त्यांनी नीला देवी यांच्याशी लग्न केले. त्यांचे नाव डेटिंगमुळेही नेहमी चर्चेत असायचे. अनेक मॉडेल्सना डेट करणाऱ्या शम्मी कपूर यांनी बेली डान्सर असलेल्या इजिप्शियन मॉडेल कैरोलाही डेट केले होते.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 21 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!