मुंबई : अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यामधील मैत्री आता आणखी घट्ट होताना दिसते. सलमानच्या आगामी ‘ट्युबलाईट’ सिनेमात शाहरुखही दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, दोघेही एकाच सेटवर शूटिंगसाठी आले असतानाचा एक फोटोही समोर आला आहे.


अभिनेता नासीर खानने ‘ट्युबलाईट’च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखसोबतचा फोटो शेअर केला आहे.

‘ट्युबलाईट’मध्ये कुणाची कोणती भूमिका असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली, तरी फोटोवरुन शाहरुखची भूमिका काही प्रमाणात लक्षात येते. शाहरुखच्या चेहऱ्यावर टॅटू काढलेला दिसतो.

https://twitter.com/khanasirr/status/820755168647970816

सलमान खान आणि शाहरुख खानसोबतचे ‘ट्युबलाईट’च्या सेटवरील नासीरने ट्विटरवर पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. कारण सिनेरसिकांना आधीच शाहरुख-सलमानच्या एकत्रित सिनेमाची उत्सुकता लागली होती. त्यात असा फोटो समोर आल्याने सिनेरसिकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

याआधी सलमान आणि शाहरुख या दोघांना ‘बिग बॉस’मध्ये एकत्र पाहण्याची संधी दोघांच्याही चाहत्यांना मिळणार आहे. शाहरुख खान आपला आगामी सिनेमा ‘रईस’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर येणार असल्याचे बोलले जात आहे.