Shahrukh Khan Salman Khan :  बॉलिवूड खान त्रयींमधील शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या मैत्रीबाबत सगळेजण जाणतात. पण, या दोघांमध्ये दोन वेळेस कडाक्याची भांडणे झाली आहेत. एकदा तर सलमान खानमुळे शाहरुखने आपल्या चित्रपटातून ऐश्वर्या रायला काढले होते. 


ऐश्वर्या रायला चित्रपटातून काढले...


सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी 'हम दिल दे चुके सनम'मध्ये काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या दोघांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीही येथूनच सुरू झाली. सलमान ऐश्वर्याबद्दल पझेसिव्ह होऊ लागला. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सलमान खानने शाहरुख खानच्या 'चलते चलते' चित्रपटाच्या सेटवर गोंधळ घातला. शाहरुख खानने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रकरण वाढले आणि सलमान आणि शाहरुखमध्ये भांडण झाले. यानंतर ऐश्वर्याला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर राणी मुखर्जीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.


शाहरुखने काय म्हटले?


शाहरुख खान या चित्रपटाचा सह-निर्मातादेखील होता. ऐश्वर्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. या प्रकरणावर शाहरुख खानने एकदा भाष्य केले होते.  शाहरुख खानने म्हटले होते की,  निर्माता म्हणून माझे हात बांधले गेले होते. मी एकटाच निर्माता नव्हतो. माझ्या जवळ काम करणाऱ्या लोकांची टीम होती. त्यावेळी आम्ही युटीव्हीसोबत काम करत होतो. चित्रपटाबाबतचा निर्णय हा 10-11 जणांनी मिळून घेतलेला निर्णय होता. संपूर्ण कंपनीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला तीन ते चार महिन्यातच शूटिंग संपवायचे होते. ऐश्वर्या ही व्यावासिक कलाकार आहे. आम्हाला त्या निर्णयाचे वाईट वाटत होते. पण हा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक होता असे शाहरुखने सांगितले. 


2008 मध्येही शाहरुख-सलमानमध्ये भांडण...


2008 मध्येही दोघांमध्ये भांडण झाले होते. कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत दोघांमध्ये वाद झाला होता. शाहरुखने सलमानच्या 'मैं और मिसेस खन्ना' या चित्रपटात कॅमिओ करण्यास नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे सलमान नाराज झाला होता. पार्टीत सलमानने शाहरुखवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याशिवाय, त्याच्या शोबद्दल भाष्य केले होते. शाहरुखने सलमानच्या 'दस का दम' या शोबद्दलही भाष्य केले होते. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे वृत्त समोर आले होते. या वादात गौरीमध्ये आली आणि ती शाहरुखसोबत लगेच पार्टीतून बाहेर पडली. त्यानंतर अनेक वर्षांनी राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत दोघांनी हजेरी लावली आणि हातमिळवणी करत सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम लावला.