Shahir Vitthal Umap : महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलावंत अर्थात शाहीर विठ्ठल उमप (Shahir Vitthal Umap) यांची आज जयंती आहे. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, कलावंत असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे शाहीर विठ्ठल उमप होय. विठ्ठल गंगाराम उमप असं त्यांचं पूर्ण नाव आहे. विठ्ठल उमप यांनी अनेक कोळी आणि भीम गीते रचली आणि गायली आहेत. त्यांचं 'जांभूळ आख्यान' चांगलच गाजलं आहे.


विठ्ठल उमप कोण होते? (Who Is Shahir Vitthal Umap)


विठ्ठल उमप यांचा जन्म 15 जुलै 1931 रोजी मुंबईतील नायगावात झाला आहे. लहानपणीच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. लोकगीत आणि पथनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करायला सुरुवात केली. 


शाहीर विठ्ठल उमप यांचा प्रवास जाणून घ्या...


शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. तसेच 10 पेक्षा अधित सिनेमांत त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'टिंग्या आणि विहीर' अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. पोवाडा, बहुरुपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, डोंबारी अशा अनेक कलाप्रकारांत विठ्ठल उमप आघाडीवर होते.


शाहीर विठ्ठल उमप यांचा 'उमाळा' हा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 'अबक,दुबक, तिबक', 'अरे संसार संसार','खंडोबाचं लगीन', 'जांभूळ आख्यान' अशी त्यांची अनेक नाटके अविस्मरणीय ठरली आहेत.  


शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलेलं पहिलं गीत कोणतं? 


विठ्ठल उमप 'कोळी गीतांचे बादशाह' म्हणून लोकप्रिय होते. 1962 मध्ये त्यांनी दिवंगत शाहीर कुंदन कांबळे यांनी लिहिलेलं 'फाटकी नोट मना घ्यावाची नाय, धंद्यात थोट मना खावाची नाय' हे गीत गायलं. त्यांचं हे पहिलचं गीत तुफान गाजलं. आजही हे गीत चाहते आवडीने ऐकतात. 'जांभूळ आख्यान'चे त्यांनी 500 पेक्षा अधिक प्रयोग केलेत.   






शाहीर विठ्ठल उमप यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा मुलगा नंदेश उमप यांनी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 'मी आणि माझा बाप' असे या कार्यक्रमाचे नाव आहे. याबद्दल माहिती देत त्यांनी लिहिलं आहे,"लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या 92 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा एक छोटा गुलदस्ता घेऊन येत आहोत". 


संबंधित बातम्या


Ravindra Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड गश्मीर महाजनीला पितृशोक! राहत्या घरात आढळला अभिनेत्याचा मृतदेह; जाणून घ्या अभिनेते रविंद्र महाजनींबद्दल...