Ravindra Mahajani : आपल्या देखण्या आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीतला 'हँडसम हंक' गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
रविंद्र महाजनी काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. सध्या ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
रविंद्र महाजनी कोण आहेत? (Who Is Ravindra Mahajani)
हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख आहे. बेळगावात जन्मलेल्या रविंद्र महाजनी यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षणादरम्यान रविंद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी लागली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविंद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली.
रविंद्र महाजनी यांना पहिला सिनेमा कसा मिळाला?
रविंद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. मिळालेल्या पहिल्या संधीचं रविंद्र महाजनी यांनी सोनं केलं. त्यांची पहिलीच भूमिका खूप गाजली. पुढे 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. शांतारामबापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि आपल्या सिनेमासाठी त्यांना विचारणा केली. 'झुंड' असे या सिनेमाचं नाव. 1974 मध्ये आलेल्या या सिनेमाने रविंद्र महाजनी यांना सुपरस्टार केलं.
रविंद्र महाजनी यांचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Ravindra Mahajani Movies)
रविंद्र महाजनी यांचा 'झुंड' हा पहिलाच सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर महाजनींकडे सिने-निर्मात्यांची रांग लागली. 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार', असे रविंद्र महाजनी यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. तसेच 'सत्तेसाठी काहीही' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा रविंद्र महाजनी यांनी सांभाळली आहे.
सत्तरच्या दशकातला 'चॉकलेट बॉय' म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवण्यासह हिंदी आणि गुजराती सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे. सिनेमांचा प्रवाह बदलायला लावणारा कलाकार अशी रविंद्र महाजनी यांची खरी ओळख आहे. रविंद्र आणि गश्मीर यांनी 'पानिपत' आणि 'देऊळ बंद' या सिनेमांत एकत्र काम केलं आहे.
संबंधित बातम्या