एका फिल्मी वेबसाईटने नाव न घेता बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचा लेख छापला होता. या लेखातील अभिनेत्याचं वर्णन शाहीद कपूरकडे अंगुलीनिर्देश करणारं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये शंकांचं वादळ उठलं आणि जो-तो या बातमीमागील तथ्य जाणण्याचा प्रयत्न करु लागला.
कर्करोगविषयक अफवांची कुणकुण शाहीदला लागताच त्यालाही हसू फुटलं होतं. आता, शाहीदने ट्वीट करुन आपली प्रकृती उत्तम आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन फॅन्सना केलं आहे. शाहीदच्या ट्वीटनंतर अवघ्या काही वेळातच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अनेक जणांनी त्याला सुदृढ आयुष्य आणि आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
'एबीपी माझा'ने शाहीद कपूरच्या कुटुंबीयांशी संपर्क केला असता या अफवा तथ्यहीन असल्याचं सांगत त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. 'ही बातमी कुठून आली? अशा बातम्या पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो?' असे प्रश्न कपूर कुटुंबाने उपस्थित केले होते. अफवांचा बाजार उठला त्यावेळी शाहीद वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेला होता.
37 वर्षांच्या शाहीदने 2015 मध्ये 13 वर्षांनी तरुण मीरा राजपूतशी विवाह केला. त्यांना दोन वर्षांची मिशा आणि दोन महिन्यांचा झैन हा मुलगा आहे. प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर त्याचे वडील, तर अभिनेत्री नीलिमा अझीज त्याची आई. मात्र घटस्फोटानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी विवाह केला, तर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केलं.
2003 मध्ये शाहीदने इष्क विष्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शाहीदची भूमिका असलेले जब वि मेट, कमिने, हैदर, उडता पंजाब, पद्मावत असे अनेक चित्रपट गाजले आहेत.
यापूर्वी, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर कपूर खानदानाने चाहत्यांना धीर ठेवण्याचं आवाहन केलं होतं. तर इरफान पठाण, सोनाली बेंद्रे यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनाही कॅन्सरनी गाठलं.