मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर दुसऱ्यांदा बाबा झाला. शाहीदने आपल्या बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं आहे. शाहीदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (5 सप्टेंबर 2018) मुलाला जन्म दिला.


शाहीदने ट्विटरवरुन आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं. मात्र अद्याप त्याने चिमुकल्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही.
एकीकडे शाहीद दुसऱ्यांदा बाबा झाला, नि त्याच दिवशी त्याची सोशल मीडिया अकाऊण्ट्सही हॅक झाली. सुदैवाने काही तासात त्याला इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊण्टवर पुन्हा ताबा मिळवता आला.

'झैन कपूरचं आगमन झालं आहे. आम्हाला परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार. आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. लव्ह यू' असं ट्वीट शाहीदने केलं आहे.


आपल्या घरातील छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी शाहीदसह कपूर कुटुंबातील सर्व जण रुग्णालयात उपस्थित होते. शाहीदची मोठी मुलगी मिशाने आज सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन चिमुरड्या भावाची भेट घेतली. मिशाने काहीच दिवसांपूर्वी आपला दुसरा वाढदिवस साजरा केला.

7 जुलै 2015 रोजी शाहीद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं होतं. शाहीद 37 वर्षांचा आहे, तर मीरा 24 वर्षांची. 26 ऑगस्ट 2016 रोजी मीराने मिशाला जन्म दिला होता.

मीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा वर्षाच्या सुरुवातीलाच होत्या. त्यानंतर शाहिदने एप्रिल महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिराचा क्यूट फोटो पोस्ट करुन आपल्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार असल्याची गुड न्यूज शेअर केली होती.