Shah Rukh Khan Hit Movie : नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान (King Khan) म्हणजे, अनेकींच्या गळ्यातील ताईत. शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) आजवर अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले असून अनेक चित्रपटांमध्ये त्यानं वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. पण, तुम्हाला शाहरुखचा असा एक चित्रपट माहितीय का? ज्या चित्रपटात किंग खानसोबत स्क्रिन करणाऱ्या अभिनेत्रीची निवड थेट त्याच्या सासुबाईंनी केली होती. शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या (Gauri Khan) आईनं शाहरुखच्या चित्रपटासाठी हिरोईन निवडली होती. शाहरुखच्या सासुबाईंच्या एका निर्णयामुळे रातोरात एका परदेशी अभिनेत्रीचं नशीब पालटलं होतं. ज्या किंग खानसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी भल्याभल्या अभिनेत्रींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्याच शाहरुखच्या सासूबाईंनी निवड केल्यामुळे अभिनेत्रीची शेवटची इच्छा पूर्ण झाली.
शाहरुख खानचा 2017 मध्ये एक चित्रपट आला होता, ज्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर बराच गल्ला जमवला. आम्ही सांगत आहोत, किंग खानच्या 'रईस' चित्रपटाबाबत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत दिसली होती. माहिरा खान (Mahira Khan) आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली.
7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'रईस' हा माहिरा खानचा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे. नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी या चित्रपटासाठी माहिरा खानचं नाव कोणी सुचवलं होतं? याबाबत खुलासा केला आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शकानं तिच्या करिअर आणि चित्रपटांशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
शाहरुखच्या सासुबाईंनी सुचवलं नाव
मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी सांगितलं की, ज्यानं रईस चित्रपटासाठी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचं नाव सुचवलं, त्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून शाहरुख खानच्या सासुबाई आहेत. किंग खानची पत्नी गौरी खानच्या आईनं माहिरा खानला तिचं पाकिस्तानी नाटक 'हमसफर'मध्ये पाहिलं होतं. राहुल ढोलकिया म्हणाले की, "आम्हाला 1980 च्या दशकातील मुस्लिम मुलीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री हवी होती. त्यामुळे हिंदी नीट बोलू शकणाऱ्या अभिनेत्रीची निवड करणं हे आमचं पहिलं प्राधान्य होतं आणि तिला थोडेसं उर्दू बोलता आलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. आम्ही अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो.
तिघींनी चित्रपट नाकारला
राहुल ढोलकिया यांनी पुढे बोलताना सांगितलं की, आम्हाला आमच्या चित्रपटाची अभिनेत्री निरागस हवी होती. शाहरुख खान 50 वर्षांचा असल्यानं आम्हाला निदान 30 वर्षांची अभिनेत्री त्याच्यासाठी कास्ट करायची होती. आमच्यासमोर सर्वात आधी तीन पर्याय होते. ज्यांचं वय 30 होतं, निरागस होत्या आणि हिंदीही बोलू शकत होत्या. अनुष्का, दीपिका आणि करीना यांच्या भूमिका खूपच लहान होत्या, पण त्यांची फी खूपच होती. त्या तिघींनीही चित्रपट नाकारला.
माहिरा खान त्यावेळी भारतात आलेली
जेव्हा बॉलीवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत काही जमलं नाही, त्यावेळी आम्ही माहिरा खानला कास्ट केलं, असं दिग्दर्शक राहुल ढोलकीया यांनी सांगितलं. ते म्हणाले की, गौरी खानची आई आणि माझ्या आईनं माहिरा खानला शोमध्ये पाहिलं होतं आणि दोघांनीही 'ही मुलगी चांगली आहे' असं म्हटलं होतं. हनी त्रेहान आमच्यासाठी कास्टिंग करत होता. म्हणून मी त्याला कॉल केला आणि विचारलं की, तो माहिरा खानला ओळखतो का? ज्यावर उत्तर आलं की, ती सध्या भारतात आली आहे. त्या दिवसांत माहिरा खान तिच्या 'हमसफर' शोचं भारतात प्रमोशन करत होती आणि त्याचवेळी तिला 'रईस'च्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :