मुंबई : शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला 'बाझीगर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्ष पूर्ण झाली. अब्बास मस्तान दिग्दर्शित या रहस्यपटाने त्या काळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अब्बास मस्तान यांनी काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक गोष्ट उघड केली. 'बाझीगर' या सिनेमाचे दोन शेवट चित्रित करण्यात आले होते.

'बाझीगर' चित्रपटाच्या मूळ क्लायमॅक्समध्ये शाहरुख साकारत असलेल्या अजयच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झालेला दाखवलेला आहे. अजय आपल्या आईच्या मांडीत अखेरचा श्वास घेताना दाखवलं आहे. मात्र हा शेवट अजयच्या आईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री राखी गुलजार यांना फारसा पटला नाही.

'राखी यांना शेवट बदलायची इच्छा होती. प्रेक्षकांची निराशा होता कामा नये. शेवट दुःखद नसावा. चित्रपटाच्या अखेरीस हिरोचा मृत्यू व्हायला नको, असं अनेक वितरकांनी सुचवलं. पोलिसांनी येऊन त्याला अटक केलेली दाखवावी, असं काही जणांचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही दोन्ही शेवट शूट केले होते.' असं मस्तान बर्मावाला यांनी सांगितलं.

'अजयला अटक होणं हे सुसंगत ठरलं नसतं आणि त्याच्या व्यक्तिरेखेचा आलेखही ढासळला असता. त्यामुळे आम्हाला अजयचा मृत्यूच दाखवायचा होता. शाहरुखने नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली होती आणि सिनेमात त्याच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाला होता, तरीही सिनेमा प्रेक्षकांनी स्वीकारला याचा आम्हाला आनंद आहे' असं अब्बास-मस्तान म्हणाले.

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाझीगर'मधून शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'बाझीगर'साठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला होता. तर अन्नू मलिक (संगीतकार), कुमार सानू (पार्श्वगायक - ये काली काली आँखें) आणि रॉबिन भट, जावेद सिद्दीकी, आकाश खुराना (पटकथा) यांनीही पुरस्कार पटकावले होते. चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुळली, ती अजूनही अनेकांना पाठ आहेत.