Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं.
सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. सीमा आणि रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव हा देखील मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ होते. सीमा देव आणि रमेश देव यांनी 1 जुलै, 1963 रोजी लग्नगाठ बांधली. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केले होते. सीमा देव आणि रमेश देव यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट शेअर करुन सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अशोक सराफ यांनी व्यक्त केला शोक
अशोक सराफ यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं, 'त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी अनेक वर्ष गाजवली. त्यांचा स्वभाव खूप छान होता. एक चांगली अभिनेत्री आपण आज गमावली आहे.'
सीमा देव यांनी जवळपास 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी 1960 मध्ये रिलीज झालेल्या मिया बीबी राझी तसेच 1966 मध्ये रिलीज झालेल्या दस लाख या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. सीमा देव यांना राजा परांजपे प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सीमा देव यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
Ramesh Deo Demise: 'जगाच्या पाठीवर' रमेश देव-सीमा एकत्र, 59 वर्षे केला सुखी संसार