मुंबई : अनिल कपूर यांच्या दोन्ही मुलांना बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांनी लाँच केलं. मात्र आपली मुलं वशिलेबाजीमुळे आली नसल्याचं अनिल कपूरने ठणकावून सांगितलं आहे.
अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर-अहुजाने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी तिने भन्साळींना 'ब्लॅक' चित्रपटासाठी दिग्दर्शनातही सहाय्य केलं होतं. तर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'मिर्झिया' सिनेमातून अनिलचा धाकटा मुलगा हर्षवर्धन कपूरला ब्रेक दिला.
'संजय लीला भन्साळी काही माझ्या घरी जेवण बनवायला येत नाहीत. तसं सोनमने भाग मिल्खा भाग केल्यावर राकेश मेहरांनीही हर्षवर्धनला आपल्या पुढच्या सिनेमात घेण्याचं वचन मला दिलं नव्हतं. त्यांच्यासारखे फिल्ममेकर अत्यंत प्रोफेशनल वागतात.' असं अनिल कपूर म्हणतो.
या दिग्गज सिनेनिर्मात्यांना जर एखाद्या कलाकारामध्ये स्पार्क दिसला तरच ते त्याला भूमिका देतात. आपल्या चित्रपटाच्या यशाबाबत आणि साहजिकच बॉक्स ऑफिसवरील नफ्याबाबत ते जागरुक असतात, असंही अनिल कपूरने निक्षून सांगितलं.
'आजच्या काळात कोणत्याच निर्मात्याला कोट्यवधी रुपये वाया घालवणं परवडणार नाही. सिनेमा तयार करणं ही महागडी बाब आहे. जर त्यांना कलाकारावर विश्वासच नसेल, तर ते एक दमडीही त्यांच्यावर खर्च करणार नाहीत' असं अनिल म्हणतो.
'पिता म्हणून मला माझ्या मुलांची काळजी वाटतेच. पण माझ्या सहभागाशिवाय निर्माते आणि दिग्दर्शक माझ्या मुलांचं कास्टिंग करतात' असंही अनिल कपूरने सांगितलं.