मुंबई : अभिनेता रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील बडे निर्माते आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 


चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी एबीपीला दिलेल्या माहितीनुसार, 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेले संजय लीला भन्साली यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरु आहे.


कोरोनाची लागण झाल्यानंतर संजय लीला भन्साली  यांनी स्वत: घरातच क्वॉरन्टीन केलं आहे.


दरम्यान बॉयफ्रेण्ड रणबीर कपूर आणि 'गंगुबाई काठियावाडी'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साली कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अभिनेत्री आलिया भटनेही स्वत:ला क्वॉरन्टीन केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, "आलिया पूर्णत: सुरक्षित असून तिला काहीही झालेलं नाही."


24 फेब्रुवारी रोजी आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली. सुरुवातीला हा सिनेमा 11 सप्टेंबर, 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे हा चित्रपट आता 30 जुलै, 2021 रोजी देशभरात प्रदर्शित केला जाईल.


24 फेब्रुवारी रोजी 'गंगुबाई काठियावाडी'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांनी संजय लीला भन्साली यांनी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये लावलेल्या सेटवर अजय देवगणसोबत चित्रीकरण सुरु केलं होतं.


या चित्रपटात अजय देवगण छोट्याशा पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि संजय लीला भन्सानी यांनी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं, जो 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता.