मुंबई : संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांची निर्मिती असलेल्या 'बाबा' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. मूकबधीर दाम्पत्याचा आपल्या मूकबधीर लेकरासाठीचा लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा वाढवणारा आहे.

'बाबा' सिनेमाच्या टीझरमुळे उत्सुकता वाढल्यानंतर संजय दत्तने या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 'तनू वेड्स मनू' फेम बॉलिवूड अभिनेता दीपक डोब्रियाल 'बाबा'मध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर त्याच्या मुलाच्या भूमिकेत आर्यन मेघजी हा बाल कलाकार दिसेल. बापलेकाच्या जोडीचं अनोखं नातं या चित्रपटात पाहायला मिळेल. दीपकच्या पत्नीच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री नंदिता धुरी दिसणार आहे.

याशिवाय स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गुप्ता हे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटाचे सह-दिग्दर्शक होते.



मूकबधीर दाम्पत्याचं मूकबधीर लेकरु. अचानक एका महिलेने हे मूल आपलं असल्याचा केलेला दावा. त्यानंतर ढवळून निघालेलं त्यांचं भावविश्व, असं या सिनेमाचं कथानक असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. 2 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.