मुंबई : महेश मांजरेकर यांची धाकटी कन्या सई बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री घेणार आहे. सुपरस्टार सलमान खानसोबत 'दबंग 3' मधून सई मांजरेकर मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे.


'दबंग'च्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या तिसऱ्या आवृत्तीत सलमानसोबत सईची जोडी जमणार आहे. महेश मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी 'दबंग 3' मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अश्वमीला अभिनयाची गोडी नसल्याने तिच्याऐवजी धाकट्या बहिणीची वर्णी लागली.

'दबंग 3' मध्ये सलमानसोबत फ्लॅशबॅक सीन्समध्ये सई दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानसोबत सईच्या दृश्यांचं चित्रीकरण झाल्याची माहिती आहे. दोघांवर एक गाणंही चित्रित होण्याची शक्यता आहे.

'दबंग 3'च्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवा यांच्या खांद्यावर आहे. 'दबंग' सीरीजमधील पहिल्या भागाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने केलं होतं, तर दुसऱ्या भागाचं सलमानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान याने.

तिसऱ्या भागात सलमान विशीतील पोलिस चुलबुल पांडेची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी सलमानने वजन घटवलं आहे. सध्या साताऱ्यातील फलटणमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या ठिकाणी चाहत्यांच्या तोबा गर्दीमुळे चित्रीकरणात अडथळे निर्माण झाले होते.

सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसेल, तर अरबाज खान मख्खीची भूमिका साकारेल. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपही चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याची व्यक्तिरेखा खलनायकाची नसून नायकाला समांतर अशी नकारात्मक भूमिका असेल, असं निर्मात्यांनी सांगितलं.

20 डिसेंबर 2019 रोजी 'दबंग 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.