मुंबई : बॉलिवूडचा संजूबाबा अर्थात संजय दत्त मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'बाबा'चे आज पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.


'तनु वेडस मनु'फेम अभिनेता दीपक डोब्रियाल 'बाबा'मध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच नंदिता धुरी-पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गुप्ता हे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटाचे सह-दिग्दर्शक होते.

संजय दत्तने ट्वीट करून त्याचे वडील आणि बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांना हा चित्रपत समर्पित केला आहे. संजयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "आमचा पहिला मराठी चित्रपट प्रत्येक बाबतीत खंबीरपणे माझ्यामागे उभे राहणाऱ्या माझ्या बाबांना समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड!,"


'बाबा'चे दिग्दर्शक राज गुप्ता म्हणाले की, "भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणींवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करतं, याची ही 'कडू-गोड' प्रसंगांनी भरलेली कथा आहे."