'डर चित्रपटात मला एक सीन होता. शाहरुख साकारत असलेली व्यक्तिरेखा माझ्यावर सुऱ्याने वार करते. या दृश्यावरुन माझं दिग्दर्शक यश चोप्रांसोबत चांगलंच वाजलं. मी त्यांना समजावत होतो, की माझी व्यक्तिरेखा कमांडो ऑफिसरची आहे. मी फिट आहे, तर एक तरुण मुलगा इतक्या सहजासहजी मला कसा मारु शकेल. जर मी त्याला बघू शकत नसेन, तर त्याने मला केलेली मारहाण एकवेळ समजू शकतो. मात्र माझ्या डोळ्यादेखत तो मला सुरा कसा खुपसू शकेल. असं असेल तर मी कमांडो ऑफिसरची भूमिका करता कामा नये' असं सनी देओलने सांगितलं.
'यश चोप्रा यांच्या वयाचा मान राखून मी गप्प बसलो. पण मला खूप राग आला होता. मी खिशात हात घातले. मला समजलंच नाही, की रागाच्या भरात मूठी आवळताना मी माझीच पँट फाडली होती' असंही पुढे सनीने सांगितलं.
Mannat Bungalow | सलीम खान यांच्या 'त्या' प्रश्नामुळे 'मन्नत' सलमानऐवजी शाहरुखच्या मालकीचं!
शाहरुख खानसोबतच्या 16 वर्षांच्या अबोल्यावर सनीने मौन सोडलं. 'मी शाहरुखशी बोलत नव्हतो, अशातला भाग नाही. पण मी अलिप्त होतो. मी फारसा सोशल होत नाही. त्यामुळे आमची भेट होत नाही. साहजिकच इतकी वर्ष गाठभेट न झाल्यामुळे आमच्यात बोलण्याचा प्रश्नच आला नाही. पण मी त्याच्याशी मुद्दाम बोललो नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल' असं स्पष्टीकरण सनीने दिलं.
डर चित्रपटाचा अनुभव आयुष्यातील सर्वात वाईट होता, असं 2001 साली 'फिल्मफेअर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सनीने सांगितलं होतं. 'माझ्याशी खोटं बोलण्यात आलं. निर्मात्यांनी फसवून माझी व्यक्तिरेखा साईडलाईन केली' असा आरोप सनीने केला होता. डर सिनेमात विलनच्या व्यक्तिरेखेला मोठं करण्यात येणार आहे, हे मला सांगितलंच नव्हतं, असं तो म्हणाला होता. खलनायकाला नायक म्हणून सादर केलं. यापुढे काम करताना काळजी घेईन, असंही सनी त्यावेळी म्हणाला होता.