Sambalpuri Singer Ruksana Bano Dies: संगीत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना बानो हिनं अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या 15 दिवसांपासून भुवनेश्वरच्या एम्समध्ये रुक्साना मृत्यूशी झुंज देत होती, पण आज अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिनं जगाचा शेवटचा निरोप घेतला. बऱ्याच दिवसांपासून रुक्सानावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शर्थीच्या प्रयत्नानंतरही रुक्सानाचे प्राण वाचू शकले नाहीत. तिनं बुधवारी (18 सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. रुक्सानाच्या निधनानं तिचे चाहते आणि समाजातील लोकांना धक्का बसला आहे. संपूर्ण म्युझिक इंडस्ट्री तिच्या झाळ्यानं हळहळली आहे. 


प्रकृती अस्वास्थामुळे निधन 


रुक्सानाच्या मृत्यू नंतर तिच्या कुटुंबियांनी मात्र, वेगळाच दावा केला आहे. रुक्सानावर विषप्रयोग झाल्याचं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुक्सानाला दुसऱ्या संबलपुरी गायिकेनं स्लो पॉयझन देऊन हळूहळू संपवलं आहे. मात्र, रुक्सानाच्या कुटुंबियांनी केलेल्या या दाव्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 15 दिवसांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान रुक्साना आजारी पडल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. 27 ऑगस्ट रोजी रुक्सानाला भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना बोलंगीर भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर बारगढमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं रुक्सानाला एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे बराच काळ उपचार घेतल्यानंतर तिनं अखेरचा श्वास घेतला. 


रुक्सानाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? 


प्रसिद्ध गायिका रुक्सानाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुक्सानाला बारगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी रुक्साना स्क्रब टायफसनं ग्रस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तिला प्युमोनिया (Peumonia), लिव्हर इन्फेक्शन आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचंही सांगण्यात आलं. बऱ्याच दिवसांपासून ती व्हेंटिलेटरवर होती. एम्सच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. रुक्साना फक्त 27 वर्षांची होती. 


आमच्या मुलीवर विषप्रयोग झालाय 


रुक्सानाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई आणि बहिणीचा आरोप आहे की, पश्चिम ओदिशामध्ये राहणाऱ्या एका प्रतिस्पर्धी गायिकेनं रुक्सानाला विष दिलं होतं. तिचा दावा आहे की, रुक्सानाला यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. मीडियाशी बोलताना रुक्सानाची बहीण रुबी बानो हिनं दावा केला की, शूटिंगदरम्यान तिच्या बहिणीला ज्यूस देण्यात आला होता, जो प्यायल्यानंतर ती आजारी पडली. रुक्सानाच्या आईनं आपल्या मुलीला न्याय देण्याची विनंती करणारा व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी जारी केला होता.