Salman Khan : 'हम साथ साथ हैं' (Hum Sath Sath hai) हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडतो. या चित्रपटाशी निगडती असे अनेक किस्से आहेत, ज्याची आजही चर्चा होते. या सेटवर घडलेल्या एका प्रसंगामुळे सलमान खानला (Salman Khan) एक रात्र पोलीस स्थानकात राहावं लागलं होतं. या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भात नुकतच सिनेमातील एका अभिनेत्याने खुलासा केला आहे.
महेश ठाकूर यांनी या सिनेमात नीलम कोठारीच्या नवऱ्याची म्हणजेच आनंदची भूमिका साकारली होती. जो राम किशन यांच्या कुटुंबाचा एकुलता एक जावई असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महेश यांनी नुकतच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. दरम्यान आजही हा प्रसंग आठवून वाईट वाटतं असं देखील महेश ठाकूर यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं?
यावर बोलताना महेश ठाकूर यांनी म्हटलं की, जेव्हा पोलीस सेटवर आले तेव्हा आम्ही एका गाण्याचं शुटींग करत होतो. त्यांनी सगळ्यांना पकडलं. तब्बू, सलमान खान, सैफ अली खान, नीलम कोठारी, सोनाली बेंद्रे सगळ्यांना पोलीस पकडून गेले होते. करिश्मा कपूर आणि मी त्या केसमध्ये नव्हतो. फक्त ते पाच जण होते. पण जे आम्ही पाहिलं आणि अनुभवलं ते अजिबात चांगलं नव्हतं. पण सुदैवाने आज तो भूतकाळ आहे. महिलांना पोलिसांना जायला सांगितलं. पण बहुतेक सलमानला त्यांनी रात्रभर थांबवून ठेवलं होतं.
शुटींग रद्द झालं - महेश ठाकूर
पुढे त्यांनी म्हटलं की, त्यावेळी बऱ्याच अफवा पसरल्या गेल्या. त्यामध्ये खरचं काहीच नव्हतं, जे नंतर सिद्धही झालं. पण त्यात सलमान सैफचं नाव होतं त्यामुळे फक्त या गोष्टीची इतकी चर्चा झाली. तेव्हा इतकी नकारात्मकता पसरली की, त्यावेळी आम्हाला शुटींग रद्द करावं लागलं. संपूर्ण कास्टला परत पाठवलं. जोधपूरला आमचं शुटींग होतं, जे रद्द झालं. पण काही दिवसांतच सगळ्यांना परत बोलवण्यात आलं. तेव्हा सगळं नॉर्मल होतं. खरंतर जेव्हा शेड्युल्ड बनवलं तेव्हा 8 दिवस जास्तीचं बनवलं होतं. आम्हाला सांगितलं की 99 दिवसांत शुटींग पूर्ण होईल. पण ही केस झाल्याने ते 8 दिवस तिथे वापरण्यात आले.