Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) अटक केली. आता या प्रकरणाची मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेता सलमान खानला 18 मार्च रोजी पाठवण्यात आलेला धमकीचा ई-मेल यूकेमध्ये (UK) लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पाठवला होता, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) इंटरपोलची मदत घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कायदेशीर पद्धतीनं यूके सरकारला विनंती पत्र (LR) पाठवले आहे. या पत्रामध्ये, मुंबई पोलिसांनी यूकेमधील त्या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथून ई-मेल पाठवण्यात आला होता. पोलिसांनी आयपी अॅड्रेस यूके सरकारला पाठवला आहे. सलमान खानला गोल्डी ब्रारने ई-मेल पाठवला असल्याचा पोलिसांना संशय आहे. ब्रिटन सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर हा संशय खरा ठरला, तर मुंबई पोलीस गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करतील.
सलमान खानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईवर आयपीसीच्यावर कलम 120 (B), 34 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ई-मेलमध्ये काय लिहिले होते?
"गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.", असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल आला सलमानला पाठवण्यात आला आहे.
एबीपी न्यूजच्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई विचारण्यात आलं की, "सलमान खानला धमकी दिली का?" या प्रश्नाचं उत्तर लॉरेन्सनं "हो" असं दिलं होतं. तो म्हणाला की, "सलमान खानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली. त्यामुळे आमचा समाज त्याच्यावर चिडला. त्याने आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही.", असंही तो म्हणाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :