मुंबई : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचं निवासस्थान 'मन्नत' पाहण्यासाठी देशभरातून चाहते मुंबईत गर्दी करतात. दोनशे कोटींच्या घरात किंमत असलेलं शाहरुखचं हे आलिशान घर कदाचित बॉलिवूडच्या दुसऱ्या सुपरस्टारच्या मालकीचं असतं. अभिनेता सलमान खानचा 'मन्नत'वर डोळा होता, मात्र वडिलांनी हटकल्यामुळे सलमानने बंगल्याच्या खरेदीचा नाद सोडला होता.


सलमान आणि शाहरुख खान यांच्या यारी-दोस्तीचे किस्से बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मुंबईत वांद्र्याच्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर शाहरुखच्या आधी सलमानची नजर पडली होती. सलमानने वडील अर्थात प्रख्यात लेखक सलीम खान यांचं मत विचारात घेतलं. मात्र सलीम खान यांनी लेकाचं म्हणणं धुडकावून लावलं.

'इतक्या मोठ्या घरात काय करणार?' असा प्रश्न वडिलांनी विचारल्यामुळे मी विषय सोडून दिला, असं सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'आता मला हाच प्रश्न शाहरुखला विचारायचा आहे, की तू इतक्या मोठ्या घरात करतोस काय?' असं सलमान गमतीत म्हणतो. सलमान वांद्र्यातच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.



शाहरुखने एका रेडिओ शोला दिलेल्या मुलाखतीत बंगला खरेदी मागच्या भावना सांगितल्या होत्या. 'मी दिल्लीहून आलो आहे. दिल्लीत कोठी म्हणजेच बंगल्याची पद्धत आहे. मुंबईत मात्र फ्लॅट किंवा अपार्टमेंट सिस्टम. दिल्लीत एखादी मध्यमवर्गीय व्यक्तीही छोट्या बंगल्यात राहते' असं शाहरुखने सांगितलं होतं.

'मी मुंबईला आलो, तेव्हा माझं लग्न झालं होतं. मी एका छोट्याशा खोलीत गौरीसोबत राहत होतो. त्यावरुन माझी सासू मला सारखी डिवचायची. जेव्हा मी मन्नत पाहिलं, तेव्हा आधी मला दिल्लीतल्या कोठींचीच आठवण झाली. त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता मी माझ्या आयुष्यातील सर्वात महागडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.' असंही शाहरुखने सांगितलं होतं