Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला बिष्णोई गँगकडून धोका असताना दुसरीकडे त्याच्या फार्महाऊस बाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरुणी दिल्ली येथील असून सलमान खानसोबत लग्न करण्याच्या मागणीसाठी तिने फार्म हाऊसबाहेर गोंधळ घातला. ही घटना मागील महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 


सलमान खानची तरुणांसोबत तरुणींमध्येही मोठी क्रेझ आहे. सलमानचे चाहते त्याच्यावर असलेले प्रेम वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात. याच प्रेमातून एका तरुणीने चक्क सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी दिल्लीहून मुंबई गाठली.


नवी मुंबईतील पनवेलमध्ये सलमान खानचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सलमान खान अनेकदा येत असतो. बॉलिवूडचे कलाकारही या ठिकाणी फार्म हाऊसवर येत असतात. याच फार्म हाऊसबाहेर एका 24 वर्षीय तरुणीने मोठा गोंधळ घातला. मला सलमान खानसोबत लग्न करायचे आहे  अशी मागणीच या तरुणीने केली. फार्म हाऊसमधील लोकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील तरुणीचा गोंधळ सुरू होता. अखेर तक्रारीनंतर  पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. 


ही तरुणी सलमान खानची मोठी चाहती आहे.  सलमान खानसोबत आपले लग्न व्हावे अशी या तरुणीची इच्छा आहे. हीच इच्छा फलद्रुप करण्यासाठी तीने थेट सलमान खानचे फार्म हाऊस गाठले. सलमान खान फार्म हाऊसमध्ये असेल या विचाराने तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 


दिल्लीहून एकटीच मुंबईत आली... 


'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीचे वय 24 वर्ष आहे. पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेकडे समुपदेशनासाठी घेऊन गेले होते. ही तरुणी दिल्लीहून मुंबईत एकटीच आली. त्यानंतर तिने नवी मुंबई गाठले. 


स्वयंसेवी संस्थेने काय सांगितले?


'सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह' नावाच्या एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, मुलीला पोलिसांनी 22 मे रोजी या तरुणीला आमच्या शेल्टर होममध्ये आणण्यात आले आणि आम्हाला तिची प्रकृती खूपच गंभीर वाटली. तिने आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आणि तिला सलमान खानशी लग्न करायचे असेच सांगत होती.


मुलीने एनजीओला काय सांगितले?


मुलीने एनजीओला सांगितले की, "मी लहानपणापासून सलमानचे सिनेमे पाहत आहे आणि मला वाटले की मी त्याच्याशी लग्न करू शकते." आता पनवेलला आल्यानंतर आता माझ्यावर इथं उपचार झाल्यावर माझी चूक झाल्याचे लक्षात आले. तो (सलमान) त्याचे आयुष्य जगत आहे आणि तो चित्रपटात करतो तसा नाही. मुलीचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे पोलिसांना आढळून आले. 


एमजीएम रुग्णालयात झाले उपचार...


दिल्लीतील तरुणीवर नवी मुंबई येथील कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तरुणीची मानसिक स्थिती चांगली नव्हती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची माहिती तिच्या आईला देण्यात आली होती. आठ समुपदेशन आणि थेरेपी सेशन झाल्यानंतर तरुणीला दिल्लीला पाठवण्यात आले.