Salman Khan House Firing Case :  बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरणी  आज मोठा गौप्यस्फोट झाला. सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना 40 गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी फक्त पाचच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे. 


सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी  अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 


पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न.... 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत. त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता.


सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना मदत पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली. 


आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी  न्यायालयाने  29 एप्रिल  दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस चौकशीत  आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 


14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार


14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.  


गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी


गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला.