मुंबई : अभिनेता सलमान खानच्या रेस 3 या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगसाठी सलमान संपूर्ण स्टार कास्टसह पोहोचला होता. मात्र यावेळी मीडियाने विचारलेल्या एका प्रश्नावर सलमान भडकला. त्याला जोधपूर न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेसंबंधी हा प्रश्न होता.


''काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा सिनेमाविषयी चिंता होती का आणि भीती वाटली का?'' असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नावर सलमान भडकला. ''मी काय कायमस्वरुपीसाठी तुरुंगात जाईल, असं तुम्हाला वाटलं का? मी बिलकुल घाबरलेलो नव्हतो,'' असं तो म्हणाला.

सलमानला 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिवाय त्याला दहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानला दोन रात्री तुरुंगात काढाव्या लागल्या होत्या. या प्रकरणातून सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

राजस्थानमधील काकाणी या गावात 1988 साली सलमानकडून काळवीटाची शिकार करण्यात आली होती. त्याच्यावरील हे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.