मुंबई : कर्नाटक निवडणुकांच्या निकालांबाबत टिप्पणी करणाऱ्या ट्वीटमुळे अभिनेता उदय चोप्राच ट्रोल झाला. भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं.


'मी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे' असं ट्वीट उदय चोप्राने मंगळवारी संध्याकाळी केलं.


उदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.
खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच!

कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी भाजपने केली आहे.

त्याचप्रमाणे काँग्रेसच्या पाठिंब्याने जेडीएस नेते कुमारस्वामी यांनीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. अशा परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपालच खरे किंगमेकर ठरणार आहेत.

कोण आहेत वजूभाई वाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना वजूभाई वाला गुजरातचं अर्थ मंत्रालय सांभाळत होते. मोदींच्या 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वजूभाईंकडे नऊ वर्ष अर्थ मंत्रालयाची जबाबदारी होती. 2005-06 या काळात वाला हे गुजरातमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

राज्याचा अर्थसंकल्प 18 वेळा सादर करण्याचा विक्रम रचणारे 80 वर्षीय वजूभाई एकमेव अर्थमंत्री आहेत. गुजरातमध्ये सत्तांतर झाल्यानंतरही (केशूभाई पटेल ते नरेंद्र मोदी) अस्तित्वात राहिलेल्या मोजक्या नेत्यांपैकी वजूभाई वाला एक आहेत. 2001 मध्ये मोदींच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी वाला यांनी राजकोटची जागा सोडली होती.

वजूभाई वाला राजकोटच्या एका व्यापारी कुटुंबातील आहेत. शालेय जीवनातच ते संघात सहभागी झाले होते. 26 व्या वर्षी वजूभाईंनी जनसंघात प्रवेश केला. केशूभाईंचे ते निकटवर्तीय होते. राजकोटचं महापौरपदही वजूभाईंनी भूषवलं होतं.

1985 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल केला होता. या जागेवरुन त्यांनी तब्बल सात वेळा विजय मिळवला. राजकोटमधील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क असल्यामुळे वजूभाईंची रिअल इस्टेट संपत्ती वाढल्याचा आरोप त्यांच्यावर होत राहिला, मात्र वजूभाईंनी त्याचा फारसा प्रभाव पडू दिला नाही.

आपल्या मजेदार भाषणांसाठी वजूभाई प्रसिद्ध आहेत. गर्दीला आकर्षित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वजूभाई वाला त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेचा विषयही ठरले होते. कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी फॅशनपासून दूर राहावं, असा सल्ला दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

संबंधित बातम्या


काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?


भाजपला धूळ चारुन सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला काँग्रेस उमेदवा


‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे 


कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं  

कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!  

बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल