Salman Khan :  बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चंदिगड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित आरोपी बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. या तिघांना हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 


चंदिगड पोलीस गुन्हे शाखेच्या डीएसपी उदय पाल यांनी सांगितले की,  चंदिगडच्या दादुमाजरा कॉलनीमधून रविंदर सिंह आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंजा यांना 25 मे रोजी अटक करण्यात आली. या संशयित आरोपींच्या चौकशीनंतर मोहाली येथील करण कपूरला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


चंदीगडमध्ये बिश्नोई आणि लकी पटियाल टोळीचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस 18 मे पासून या तिघांचा माग काढत होते. हे तिन्ही आरोपी मोबाईल अॅप द्वारे संवाद साधून पोलिसांपासून वाचत होते. 


भटिंडा येथील बिश्नोईचा बॅचमेट असलेल्या झिंजाने बेकायदेशीरपणे पैसे जमवले होते. त्याने चंदिगड आणि पंजाबमधील तरुणांना आपल्या नेटवर्कमध्ये सहभागी होण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्यावर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती चंदिगड पोलिसांनी दिली. झिंजाचा जवळचा सहकारी रविंदरने त्याला पैसे उकळण्यात मदत केल्याचा आरोप आहे


तर, तिसरा आरोपी करण कपूर हा आपल्या घरातून बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसाय चालवतो आणि त्याने  अनेकांना परदेशात पाठवले असल्याची माहिती समोर आली. 


सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार.... 


मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. 


लाँरेन्स बिष्णोईचा  या कारणांसाठीच आहे सलमानवर राग...


लॉरेन्स बिष्णोई हा बिष्णोई समाजातून येतो. हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. 


इतर संबंधित बातमी :