Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पनवेल पोलिसांनकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. या चौघांनी सलमान खानच्या कारवर पनवेलमध्येच हल्ला करण्याचा कट आखला होता. या कटाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे.
14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवान तपास करत आरोपींना अटक केली. आता पनवेल पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न होता. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान अशी चार अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने कॅनडामध्ये असलेला त्याचा चुलत भाऊ अनमोल बिष्णोई आणि सहकारी गोल्डी ब्रार याने एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करून अभिनेता सलमान खानला मारण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गॅलेक्सीवरील हल्ल्याआधी आखला होता कट
मिळालेल्या माहितीनुसार, या कटामध्ये सलमान खानची गाडी थांबवणे किंवा फार्महाऊसवर हल्ला करणे हा त्यांचा उद्देश होता. सूत्रांनी असेही सांगितले की लॉरेन्स बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन नेमबाजांना अटक करण्याच्या एक महिना आधी हा कट आखला होता.
नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून, अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी आयपीसीच्या कलम 115, 120 (बी) आणि 506 (2) अंतर्गत पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार, अजय कश्यप उर्फ धनंजय तपसिंग, रोकी शूटर, सतीश कुमार, सुखा शूटर, संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया, रोहित गोधरा, वसीम चेना, डोगर, सिंटू कुमार, विशाल कुमार, संदीप सिंह, रियाझ उर्फ चंदू, कमलेश शाह आणि इतरांना आरोपी करण्यात आले आहे.