Salman Khan Firing Case : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी गँगस्टर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांसाठी 9 मिनिटांचे भाषण केले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणातून हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढवले.

  
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. 


अनमोलने दिले 9 मिनिटांचे भाषण


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपासानंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार,  आरोपी अनमोल बिश्नोई याने हल्लेखोर सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक भाषण दिले. आपल्या भाषणात अनमोलने म्हटले की, घाबरू नका, आत्मविश्वासाने तुम्हाला हे काम पूर्ण करायचे आहे. तु्म्ही आपल्या समाजासाठी चांगले काम करत आहात, असे अनमोलने म्हटले. ऑडियो चॅटच्या माध्यमातून अनमोलने हल्लेखोरांना संबोधित केले होते. जवळपास 9 मिनिटाचे हे भाषण आहे. 


अनमोलने भाषणात काय म्हटले?


आपल्या भाषणात अनमोल बिश्नोई याने सांगितले की, तुम्ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात चांगले काम करण्यास जात आहात, हे काम चांगल्या पद्धतीने करा. हे काम पूर्ण होताच, तुम्ही एक इतिहास रचणार आहात. जे काम करण्यास जात आहात, ते धर्माचे काम आहे. त्यामुळे दिलेली जबाबदारी पार पाडताना मनात कोणतीही भीती बाळगू नका असे त्याने म्हटले. त्याने पुढे म्हटले की, हे काम करणे म्हणजे समाजात बदल घडवण्यासारखे आहे. समाज सुधरवणे आणि ज्यांनी चुकीचे काम केलंय त्यांना शिक्षा देण्यासाठी हे काम आपण करत असल्याचे अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणात म्हटले. 


अनमोलने पुढे म्हटले की, बिश्नोई गँगचे एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा कधी आपण असे काम करतो तेव्हा पूर्ण मॅगझीन रिकामी करतो. तुम्हीदेखील सलमान खानच्या घराबाहेर जाऊन पूर्ण मॅगझीन रिकामी करा असे त्याने म्हटले. मात्र, सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक दिसल्याने हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी बाईक न थांबवता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आणि फरार झाले. 


इतर संबंधित बातमी: