मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman khan) घरावर गोळीबाराची घटना घडल्याने बॉलिवूड (Bollywood) विश्वात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यामुळे, याप्रकरणाची, पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना 29 एप्रिल दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आता पोलीस चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. त्यातच, याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.


सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. सोनू उर्फ सुभाष चंदर (37 वर्षे) आणि अनुज थापन (32) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. सोनू हा शेती करतो, आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.


दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळाले आहे. गुजरातच्या सूरतमधील तापी नदीत आरोपींनी फेकलेले दुसरे पिस्तुल पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यामुळे, गोळीबार प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. 


गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या


14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  


40 गोळ्या झाडण्याच्या होत्या सूचना 


सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 


हेही वाचा


Salman Khan House Firing Case : मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड