Konkona Sen Sharma : बॉलिवूडमध्ये कसदार अभिनयाने आपली छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून कोंकणा सेन शर्माचे (Konkona Sen Sharma) नाव घेतले जाते. कोंकणाने आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा एक चाहता वर्ग असून तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रतीक्षा करत असतो. कोंकणा सेन शर्मा आपल्या सिनेकारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्याच्या बाबतही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोंकणा सेनने आपला पती अभिनेता रणवीर शौरी सोबत 2020 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोंकणाच्या आयुष्यात प्रेमाचा बहर आला असल्याचे म्हटले जात आहे. कोंकणा सध्या तिच्यापेक्षा सात वर्ष लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. हा अभिनेता म्हणजे अमोल पराशर आहे.
रणवीरने केलं रिलेशनशीप कन्फर्म?
ट्विटरवर एका पॅरोडी अकाउंटने अमोलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अमोलच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राजकीय भाष्य असून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर आपले मत व्यक्त केले. हा स्क्रिनशॉट शेअर करताना पॅरोडी अकाउंटने, 'कोंकणा सेन शर्माने मोदी भक्त रणवीर शौरीला सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पराशरला डेट करण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला.'
पॅरोडी अकाउंटच्या या पोस्टवर रणवीर शौरीने कमेंट केली. कोकणा आणि अमोल यांच्यातील नात्यालाही त्यांनी आपल्या कमेंटद्वारे पुष्टी दिली की काय याची चर्चा सुरू झाली आहे. रणवीरने या पोस्ट खाली, 'होय, मी पण सहमत आहे.' अशी कमेंट केली.
रणवीरच्या या कमेंटनंतर कोंकणा सेन शर्मा ही अमोलला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोंकणा आणि अमोल यांनी डॉली किट्टी आणि वो चमकते सितारे यामध्ये एकत्रित काम केले आहे. याआधीदेखील दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, या दोघांनीदेखील या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही.