Salman Khan & Zeeshan Siddique Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमदार झिशान सिद्धीकी यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


सलमान खान आणि झिशान सिद्दीकींना पुन्हा धमकी


मुंबईतील वांद्रे परिसरात दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत झिशान सिद्दीकी यांच्यावरही गोळ्या झाडण्याचा आरोपींचा प्लॅन होता असं बोललं जातं. याशिवाय, बाबा सिद्दीकी यांच्या जवळचा मित्र असलेला अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आता सलमान खान आणि झिशान सिद्दीकी या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


निवडणुकीत झिशान सिद्दीकींना 'भाईजान'चा पाठिंबा


झिशान सिद्दीकी यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्याला सलमान खानचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी सोमवारी सांगितलं होतं.