Maine Pyar Kiya Re-Release : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा (Bhagyashree) ब्लॉकबस्टर चित्रपट 'मैंने प्यार किया'ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हा चित्रपट 80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सलमान आणि भाग्यश्रीची जोडी  प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील गाणीही सुपरहिट झाली होती. या चित्रपटातून दोन्ही कलाकार एकाच रात्रीत सुपरस्टार झाले होते. 


बॉलिवूडला मिळाला प्रेम


सूरज बडजात्याचा 'मैने प्यार किया' हा 80 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सलमान खानने प्रेम नावाची भूमिका साकारली होती. सलमान खानची ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. भाग्यश्रीने सुमनची व्यक्तीरेखा साकारली होती. 


सुमन ही साधी मुलगी होती. सुमन आणि प्रेमचे वडील बालपणीचे मित्र होते, पण त्यांच्यात श्रीमंती आणि गरिबीची उंच भिंत होती. या भिंतीमुळे प्रेमच्या वडिलांनी सुमनला आपली सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. या चित्रपटाने सलमानच्या कारकि‍र्दीला मोठी कलाटणी दिली होती. या चित्रपटात सलमान खान, भाग्यश्रीसोबत लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू, आलोक नाथ, मोहनीश बहल आदींच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 


आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्त्वाची घोषणा करत 'मैने प्यार किया' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करत असल्याची घोषणा केली. 


'मैने प्यार किया' होणार पुन्हा प्रदर्शित






राजश्री फिल्मसने आपल्या अधिकृत इ्न्स्टाग्राम अकाउंटवर माहिती देत 'मैने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करणार असल्याची माहिती दिली आहे. सिनेरसिकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या प्रेम आणि सुमनची प्रेम कहाणी 23 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट पीव्हीआर आणि सिनेपॉलिसमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्याबद्दल भाग्यश्रीनेदेखील आनंद व्यक्त केला आहे. 


सलमानपेक्षा भाग्यश्रीला  अधिक मानधन...


एका वृत्तानुसार, 'मैने प्यार किया' चित्रपटाच्या वेळी भाग्यश्रीने पहिल्यांदात जीन्स आणि वन पीस ड्रेस परिधान केला होता. त्याशिवाय, भाग्यश्रीला सलमानपेक्षा अधिक मानधन मिळाले होते. सलमान खानला 30 हजार रुपये आणि भाग्यश्रीला एक लाख रुपयांचे मानधन मिळाले होते. जवळपास एक कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने जवळपास 28 कोटींची कमाई केली होती.