मुंबई :  पाकिस्तानात भारतीय सिनेमा प्रदर्शनावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिल पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये एकमेव मराठी सिनेमा ‘सैराट’सह एस.एस.राजामौलीचा बाहुबली, डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स दाखवले जाणार आहेत.

राजामौली यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे.”


राजामौलीचा बहुचर्चित बाहुबली-2 द कन्क्लूजन गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाला होता. याच्या प्रदर्शनानंतर भारतीय सिनेइतिहासातील हा सर्वात यशस्वी सिनेमा ठरला. जगभरात बाहुबली-2 ने तब्बल 15 हजार कोटीची कमाई केली.

तर सैराट सिनेमा हा देखील मराठी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी सिनेमा ठरला आहे. प्रदर्शनानंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळेने केलं आहे. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या नव्या चेहऱ्यांना या सिनेमात संधी देण्यात आली.