Chrisann Pereira: सडक 2 (Sadak-2) चित्रपटातील अभिनेत्री क्रिसॅन परेराला (Chrisann Pereira) ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. क्रिसॅनसह आणखी एका डीजेला अशाच प्रकारे अडकावल्याचा आरोप थोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांच्यावर करण्यात आला आहे.  


भूलथापा देऊन शारजाला पाठवून सोबत अमली पदार्थ देऊन क्रिसॅन परेरालाला अडकवल्याचा आरोप अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्यावर करण्यात आला  आहे. पूर्व वैमनस्यातून क्रिसॅन आणि डी जे क्लेटन रॉड्रिग्जला अडकवल्याचा संशय आहे. 


अभिनेत्री  क्रिसॅन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी  तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते.


तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे आणि त्याला  क्रिसॅन परेराच्या आईचा बदला घ्यायचा होता. म्हणून त्याने रवीसोबत क्रिसॅनला फसवण्याचा एक प्लॅन रचला आणि तिला ड्रग्सने भरलेली ट्रॉफी घेऊन यूएईला पाठवले. आता अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी  यांना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, अँथोनी पॉल हा मुंबईतील मालाड आणि बोरिवली भागात बेकरी चालवतो. पॉलची एक बहीण त्याच इमारतीत राहते जिथे क्रिसॅनची आई राहते.






क्रिसॅन परेरा हिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटासोबतच तिनं बाटला हाऊस या चित्रपटात देखील काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटामध्ये क्रिसॅन परेरा बरोबरच  पूजा भट्ट, आलिया भट्ट,  संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांनी देखील काम केलं आहे.  क्रिसॅन परेरा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 25 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!