Rubina Dilaik Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आई होणार आहे. सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला आई-बाबा होणार असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रुबिना आणि अभिनव आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण अभिनेत्रीने या चर्चांवर भाष्य करण्यास टाळलं. आता तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रुबिना आणि अभिनवने शेअर केलेल्या फोटोमध्ये ते एका बोटीवर दिसत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीचे बेबी बम्प दिसत आहेत.
रुबिनाची पोस्ट काय आहे? (Rubina Dilaik Post On Pregnancy)
रुबिनाने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"अभिनव आणि मी रिलेशनमध्ये आलो तेव्हाच एकमेकांना वचन दिलं होतं की, संपूर्ण जग एकत्र एक्सप्लोर करू. अनेक दिवस डेटिंग केल्यानंतर आम्ही लग्नबंधनात अडकलो. आता लवकरच कुटुंब म्हणून जग फिरू आणि छोट्या ट्रॅव्हलरच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत". रुबिनाच्या गुडन्यूजमुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
रुबिना दिलैकच्या पोस्टवर श्रृती झा, आस्था गिल, राजीव अदातिया, जान कुमार सानू, चेतना पांडेसह अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. रुबिना सध्या अमेरिकेत असून कॅलिफोर्नियामधून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस 14'मुळे (Bigg Boss 14) अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. रुबिना आणि अभिनव लग्नानंतर एकमेकांपासून दूर झाले होते. पण बिग बॉसच्या घरात त्यांना त्यांच्या प्रेमाची पुन्हा जाणीव झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत. लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे.
संबंधित बातम्या