न्यूयॉर्क : अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यांच्या आजाराबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आता त्यांची मुलगी रिद्धीमाने वडिलांच्या प्रकृतीशी संबंधित अपडेट दिली आहे.


रिद्धीमा म्हणाली की, "ऋषी कपूर यांची प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याची कोणतीही बाब नाही. खरंतर त्यांच्या आरोग्याबद्दल मी कधीही चिंतेत नव्हते. ते फक्त रुटीन टेस्ट करत आहेत, जे त्यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. ते अनेक वर्षांपासून आपल्या सर्व तपासण्या करत आहेत. सगळं काही व्यवस्थित होईल, असा विश्वास आम्हाला आहे."

दरम्यान, सध्या नीतू कपूर आणि रणबीर कपूर ऋषी यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा, अनुपम खेर, जावेद अख्तर, आलिया भट्ट आणि सोनाली बेंद्रे यांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती.

वैद्यकीय उपचारांमुळे ऋषी कपूर त्यांची आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित नव्हते. त्यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचीही चर्चा रंगली होती. परंतु रणधीर कपूर यांनी ऋषी यांच्या आरोग्याबाबत सुरु असलेल्या शक्यता फेटाळल्या होत्या.

राजमा चावल हा ऋषी कपूर यांचा आगामी चित्रपट असून लीना यादव यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे.