मिलाप झवेरीचा 'सत्यमेव जयते' सिनेमा हा तद्दन मसालापट असेल याचा अंदाज आला होताच. मसालेपट काही वाईट नसतात. निखळ मनोरंजन हा त्याचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे त्यात प्रेमगीत, हाणामारी, आयटम साँग, रडारड, विनोदांची पेरणी आदी जिन्नस असतात. हा सिनेमा तसाच असणार ही अपेक्षा होतीच. म्हणजे, टायर फाडून बाहेर येणारा जॉन, जॉच्या मागे लागलेला पोलिस मनोज वाजपेयी हे पाहता शंभर टक्के निखळ मनोरंजन होईल अशी खात्री आपण बाळगतो खरी. पण आपला पुरेपूर भ्रमनिरास होतो. आत्रंकी कथानक, त्याची बोगस ढोबळ मांडणी आणि यंत्रवत काम करणारा मुख्य नायक आणि त्याची नायिका पाहता हा सिनेमा समजून घेणं भयंकर कष्टाचं काम होऊन बसतं. म्हणूनच या सिनेमाचं नाव 'सत्यमेव जयते' न ठेवता 'कष्टमेव जयते' ठेवायला हवं.
मुळात सिनेमाची गोष्ट काय? तर मुंबईसारख्या शहरात पोलिसांचे खून होऊ लागतात. हे सगळे पोलिस भ्रष्ट असतात. मग हे खूनसत्र थांबवण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला बोलावलं जातं. मग तो येतो आणि सुरु होतो खुनी हल्लेखोराला पकडण्याचा ससेमिरा. खुनी सतत त्या पोलिसाच्या टचमध्ये असतो. असं करत तो पोलिसांना मारत सुटतो. याचं पुढे काय होतं, तो खुनी या सगळ्यातून कसा सुटतो, तो नेमका कोण असतो, तो असं का करत असतो या सगळ्याचा उलगडा म्हणजे हा सिनेमा.
आता ही गोष्ट वाचायला बरी वाटते. पण ती पडद्यावर मांडताना यात लॉजिक असायलाच हवं. म्हणजे अगदी तंतोतंत लागणारं लॉजिक नको. पण निदान काहीतरी गृहित धरायला हवं. आपण दाखवू ते लोक पाहतील अशी ठाम समजून करुन घेऊन दिग्दर्शकाने सिनेमा बनवला आहे. अगदीच उदाहरण द्यायचं, तर मुंबईत पोलिसांचे खूप पाडणं आता तितकं सोपं राहिलं नाही. बरं. तो पाडतो खून असं गृहित धरुन चालू. पण त्यासाठी आवश्यक गेम यात असायला हवा. तो सहज कुणाच्याही वेषात येतो. बेमालून पोलिस ठाण्यात जाऊन एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला संपवतो. आता तो संपवतो म्हणून आपण मान्य करायचं की हं.. याने संपवलं. बरं. एकदा, दोनदा ठीक आहे. सगळेच खून असे सलग होत राहतात. त्यामुळे हा सगळा खेळ अत्यंत फुसका आणि हस्यास्पद होतो. अत्यंत ढिसाळ पटकथा, त्यात लांबलेले कंटाळवाणे डायलॉग आणि त्यात भरलेला मेलोड्रामा यामुळे सिनेमा कंटाळवाणा होतो. नाही म्हणायला मनोज वाजपेयी यांनी तळमळीने काम केलंय. पण एका पॉईंटनंतर त्यांच्या संवादफेकीचंही कसं हसं होईल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. जॉन अब्राहम संपूर्ण सिनेमाभर यंत्रवत वावरतो. त्याची गर्लफ्रेंडही तशीच. दिसायला देखणी पण संवाद फेक कमालीची कोरी. त्यातल्या त्यात बरं वाटतं ते दिलबर गाणं ऐकून, पाहून आणि या सिनेमातले मराठी चेहरे पाहून. यात अमृता खानविलकर, गणेश यादव, देवदत्त नागे हे चेहरे वेगवेगळ्या भूमिकांत दिसतात.
एकूणात या सिनेमात आनंद देईल असं फार काही नाही. स्वातंत्रदिनी उगाच जीवाला कष्ट न दिले तर उत्तम. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत, केवळ... केवळ एक स्टार.
सत्यमेव जयते : कष्टमेव जयते
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2018 12:18 PM (IST)
आत्रंकी कथानक, त्याची बोगस ढोबळ मांडणी आणि यंत्रवत काम करणारा मुख्य नायक आणि त्याची नायिका पाहता हा सिनेमा समजून घेणं भयंकर कष्टाचं काम होऊन बसतं. म्हणूनच या सिनेमाचं नाव 'सत्यमेव जयते' न ठेवता 'कष्टमेव जयते' ठेवायला हवं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -