अभिजीत इनामदार आता निवृत्त आहेत, पण त्यांना आजाराने ग्रासलं आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या असून आठवड्यातून दोनदा त्यांना डायालिसीस करावं लागतं. त्यामुळे त्यांना नेहमी जपून राहावं लागतं. अर्थातच अशा माणसाला आपल्या जगण्याची आणि मृत्यूची दोन्हीची भीती वाटत असते. याच गोंधळात ते जगताहेत. त्यांची पत्नी लता त्यांना पूर्ण साथ देते आहे. अभिजीतचं लक्ष इतरत्र लागावं यासाठी त्या खूप धडपडतायत. त्याचाच एक भाग म्हणून त्या अभिला एका गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जातात. त्या कार्यक्रमात अभिजीत यांना उरलेल्या जगण्याचा आणि त्यात राहून गेलेल्या कामाचा साक्षात्कार होतो. मग जे शेष आहे ते विशेष करण्याकडे त्यांचा प्रवास सुरु होतो, त्याची ही गोष्ट आहे.
सिनेमाची गोष्ट रंजक आहे. आशादायी आहे. आपलं जगणं जगताना दुसऱ्याचं जगणं समृद्ध करण्याचा मेसेज ही कथा देते. पण त्याचा विस्तार करताना अर्थात पटकथा लिहिताना त्यात असलेल्या दृश्यांची लांबी आणि गरज याचा विचार व्हायला हवा होता असं वाटून जातं. उदाहरण द्यायचं तर असाच एक फोन आल्यानंतर लताचं गंभीर होणं. अभिजीत यांचा मुलाग दिलीप आपल्या वडिलांबद्दल बोलत असातना रेयान नामक परदेशी मुलगा तिथून निघून जाणं.. असे काही प्रसंग पटकथेच्या वेगाला ब्रेक लावतात. शिवाय, उत्तरार्धात येणारा दिलीपचं वडिलांबद्दलचा परिच्छेद आहे आशयपूर्ण पण तो थोडा कमी व्हायला हवा होता असं वाटून जातं. अर्थात अशोक सराफ यांचं या सिनेमातं असणं हुकमी आहे. अभिजीत साकारताना त्यांनी त्याच्या छटा नेमक्या साकारल्या आहेत. अभिजीतचं आजाराला घाबरुन कोशात जाणं.. त्यानतर त्याचं झालेले परिवर्तन.. हे सगळं सुरेख आहे. छायांकार सुरेश देशमाने यांनी ते टिपले ही उत्तम आहेत. यात लता साकारताना पद्मिनी कोल्हापुरे काहीशा कमी पडल्याचं वाटतं. काही प्रसंगात त्या सुंदर दिसल्या आहेत. त्यांचं हसू आजही मनमोहक आहे. पण काही इंटेन्स प्रसंगांमध्ये मात्र त्यांचे हावभाव कमी पडल्याचं जाणवतं. एकीकडे अशोक सराफ एक्स्प्रेसिव्ह होत असताना दुसरीकडे पद्मिनी यांचं शांत असणं अधिक कोरडं वाटू लागतं.
सिनेमाचं संगीत मात्र उत्तम आहे. यातली गाणी काळजाचा ठाव घेतात. आवर्जून उल्लेख करायला हवा तो कौन है हम.. आए है कहांसे.. ही गजल तर काबील ए तारीफ आहे. हरिहरन यांचा आवाज आणि गुरु ठाकूर यांचे शब्द... अस्सल गजल ऐकल्याचं समाधान देतात. शिवाय प्रवास हे टायटल ट्रॅकही उत्तम जमला आहे. बाकी सगळ्याच गोष्टी जमून येऊनही केवळ पटकथा संथ असल्यामुळे आणि त्यातले काही प्रसंग अनाठायी वाटल्यामुळे याची पकड काही प्रमाणात सुटू लागते.
एकूणात कथा, छायांकन, संगीत, कलादिग्दर्शन आणि अशोक सराफ यांचा अभिनय या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स. शशांक यांच्याकडून पुढच्या सिनेमाबद्दल अपेक्षा बाळगायला हव्यात असा हा दिग्दर्शक आहे.