माणसाचं व्यक्तिमत्व जेवढ मोठं तेवढं त्याला सिनेमात बसवणं अवघड. त्यातही त्याला विविधांगी पैलू असतील आणि त्या सर्वच बाबतीत तो तितकाच प्रतिभावंत असेल तर त्याहून ते अवघड. म्हणजे, गैरसमज करुन घेणार नसाल तर अधिक सविस्तर सांगतो, समजा एखाद्या खेळाडूवर चित्रपट बनवायचा असेल तर तो तेवढ्यापुरताच होतो. तो खेळ आणि त्या खेळाडूचा स्ट्रगल आणि यश. हा असा मामला. पण समजा, पुलंसारखं व्यक्तिमत्व असेल तर? म्हणजे, हा माणूस उत्तम लेखक आहेच. त्यातलं त्याचं काम केवढंतरी मोठं आहे. पण त्यासोबत तो गातोही. तो सिनेमा दिग्दर्शकही आहे. अभिनेताही आहे. पेटीही वाजवतो. नाटकातही काम करतो.. अरे बापरे. तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वावर सिनेमा करायचा असेल तर काय करावं? तर ते काम तितकंच अवघड आणि आव्हानात्मक होतं. पण विजय तेंडुलकर म्हणतात तसं, कुवतीपलिकडे टाकलेलं एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं. इतिहास रचतं. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'भाई- व्यक्ति की वल्ली' हा चित्रपट असंच शिवधनुष्य आहे. जे आयत्यावेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे पेललं आहे. आता प्रश्न पुढचा येतो, की कोणता तो निर्णय? तो निर्णय सिनेमाचे दोन भाग करण्याचा.
पुलंचं आयुष्य विस्तारलेलं आहेच. पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांमुळे ते आणखी वलयांकित होतं. अतिरथी-महारथी त्यांच्या भवती होते. त्या प्रत्येकाची आपली अशी उत्तुंग प्रतिभा होती. म्हणूनच ही सगळी मंडळी जेव्हा सिनेमात येतात तेव्हा ते काम आणखी जबाबदारीचं होतं. या सिनेमातही अनेक मंडळी आहेत. आपल्याला पुलंच्या लिखाणातून अमर झालेली अनेक मंडळी भेटतात. पण वेगळ्या नावाने. नाथा कामत, रावसाहेब, आण्णा कर्वे, चंपूताई या मंडळींसह आपल्याला वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गदिमा अशी मंडळी भेटतात. या सगळ्यांना गुंफून चित्रपट बनवण्यात आला आहे. याच्या दुसऱ्या भागात तर बाळासाहेब ठाकरे, भक्ती बर्वे, विजया मेहता, पंडित नेहरु अशी मंडळीही दिसणार आहेत. पण ते नंतर बोलू.
भाई.. चा पहिला भाग आहे तो पुलंच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यावर बेतलेला. म्हणून या सिनेमात सुनिताबाई आणि भाई यांच्यासह त्यांची आई जास्त दिसतात. पुलंच्या शालेय जीवनापासून सुरु झालेला प्रवास हा पुढे भीमसेन, वसंतराव आणि कुमार यांच्या मैत्रीपर्यंत येतो. या टप्प्यांमध्ये आपल्याला त्यांचं शालेय जीवन, काॅलेज, वैवाहिक स्थिती आणि पुढे कुटुंबातल्या घडामोडी दिसत जातात.
मोठ्या माणसावर सिनेमा करताना संबंधित व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी दाखवणं शक्य नसतं. पण केवळ असे प्रसंग ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्व उभं राहणं आवश्यक आहे, ते निवडावे लागतात. पटकथा लिहिताना ते प्रसंग नेमके घेतल्याचा फायदा सिनेमाला होतो. अगदीच उदाहरणादाखल पुलंच्या लग्नचा प्रसंग असो, किंवा सुनिताबाईंना मागणी घालण्याचा प्रसंग असो. पुढे लग्नानंतर त्यांच्या आयुष्या आलेल्या वादळाचा एक प्रसंगही यात आहे. यामुळे केवळ पुलं नव्हेत तर सुनिताबाईंचं व्यक्तिमत्वही उभं राहतं. संवाद, छायांकन, वेषभूषा, रंगभूषा यांना दाद द्यायला हवीच.
पटकथा लिहिताना पुलंच्या चांगल्या बाजू दाखवल्या आहेतच. पण काही कौटुंबिक प्रसंगात नवरा म्हणून मुलगा म्हणून होणारं दुर्लक्षही यात अधोरेखित करण्यात आलं आहे. अर्थात सुनिताबाईंनी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात ते लिहिलं आहेच. त्याचे काही संदर्भ यात दिसतात. पुलंच्या दोन्ही बाजू यात आल्यामुळे तो वास्तवदर्शी होतो. खरा वाटतो. दिग्दर्शकीय कौशल्य दिसतं ते इथं.
अभिनयाबाबत नाथा कामत (महेश मांजरेकर), अण्णा कर्वे (विद्याधर जोशी), वसंतराव (पद्मानाभ बिंड), भीमसेन (अजय पुरकर), कुमार (स्वानंद किरकिरे), आई (अश्निनी गिरी) आदी सर्वांनीच संयत आणि योग्य भूमिका निभावल्या आहेत. पुलंबद्दलच्या अनेक गोष्टी यातून उलगडल्या आहेत. आणि सरतेशेवटी सागर देशमुख आणि इरावती हर्षे. यांनी पुलं आणि सुनिताबाई यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सागर पुलंच्या भूमिकेत पाहणं हे सरप्राईज पॅकेज आहे.
संकलनाबाबत पटकथेत येणारे गदिमांचा प्रसंग, रावसाहेबांचा बेळगावचा प्रसंग आणि शेवट मात्र काहीसे खटकतात. गदिमा आणि पुलंचा प्रसंग चांगला वठला आहे. पण गदिमा आणि पुलंचे नातेसंबंध त्यात स्पष्ट होत नाहीत. रावसाहेबाचा प्रसंगही लांबलेला. तर सिनेमाचा शेवट अचानक होणारा. त्या शेवटानंतर उत्तरार्धात जो ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात काय असेल याचे संकेत देण्यात आले आहेत, त्यावरुन नव्या भागाची उत्सुकता वाढते.
एकूणात, सिनेमा जमला आहे. नव्या पीढीला पुलं कोण होते, ते प्रतिभावंत असले तरी कौटुंबिक पातळीवर ते कसे होते हे सगळं या भागात कळतं. अर्थात त्यांचा कॅनव्हास मोठा असल्यामुळे अमुक प्रसंग यात हवा होता किंवा तो का आहे, असं म्हणण्यात अर्थ नाही. ते व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहणं महत्वाचं. ते उभं राहतं. यात सगळं आहे. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत चार स्टार्स.
हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा.