रणवीर सिंग हा खरंच कमाल एनर्जीचा नट आहे. त्याने यापूर्वी केलेले सिनेमे पाहता कमालीची पॅशन असल्याशिवाय ते रोल करणं शक्य नव्हतं. बॅंड बाजा बारात, रामलीला, बेफिक्रे, सिंबा, पद्मावत आणि आता गली बाॅय एकामागे एक चित्रपट करताना कमालीच्या वेगळ्या बाजाचे चित्रपट त्याने हाताळले आहेत. त्यातही गली बाॅय खूप उजवा. कारण या चित्रपटात केवळ अभिनय नाही तर रॅप आहे. हिप-हाॅप आहे. ते त्यानंच केलं आहे. झोया अख्तरचं दिग्दर्शन, विजय मौर्य यांचे संवाद आणि रणवीर-अलिया यांचं काॅम्बिनेशन हाचा फक्कड हार्ड डोस तयार झाला आहे. त्यामुळे अपना टाईम आएगा म्हणणाऱ्या गली बाॅयला बघण्यासाठी सिनेप्रेमी थिएटरमे जाएगा.. यात शंका नाही.
आपण आजवर केवळ चार बोटल व्होडका.. असे काहीसे निरर्थक रॅप पाहिले, ऐकले. पण रॅपही खूप अर्थपूर्ण असू शकतं. त्यातूनही तुम्ही भाष्य करु शकता. खरंतर तेच माध्यम आहे व्यक्त व्हायचं असा जणू मेसेज या चित्रपटातून मिळाला आहे. यातली गाणी यापूर्वीच हिट झाली आहेत. अपना टाईम आएगा, मेरी गली मे, क्यू हैं इतनी दूरी.., बोलो आझादी.. अशी रॅप ऐकताना कमाल मजा येते. यातलं इतनी दूरी क्यू.. हे गाणं ऐकताना तर डोळे कमाल पाणावतात. रणवीरने ते सादरीकरणंही सुरेख केलं आहे.
ही गोष्ट मुरादची आहे. धारावीत राहणाऱ्या मुरादचे वडील ड्रायव्हर आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मुराद तसा गुणी आहे, पण त्याची स्वप्न मोठी आहेत. अशावेळी काॅलेजमध्ये एक हिपहाॅप इव्हेंट असतो. तो मुराद पाहतो. त्यातला एमसी शेर त्याला प्रभावित करतो. त्यातून मुराद आणि शेरची ओळख होते. यातून शेर त्याला रॅप शिकवतो. आणि मग मुरादचा गली बाॅय होतो. त्याची ही कहाणी. ही कहाणी कमालीची रंजक आहे. ती रंजन करतेच पण डोळ्यात जाता जाता अंजनही घालते. प्रेमाचा एक त्रिकोण यात आहे. त्यातही प्रेमाच्या आजच्या पिढीच्या मनात असलेल्या छटा दिसतात. ब्राऊन इज ब्युटिफुलसारखा मेसेज दिसतो.
पटकथा, कथा उत्तम आहेच. त्याला तितक्याच सोप्या पण भेदक संवादांची जोड आहे. यातल्या एका संवादात शेर एका परदेशी मुलीशी बोलत असतो. त्यावेळी मुराद त्याला विचारतो तुझी तिच्याशी ओळख कशी झाली? यावर शेर म्हणतो, "अरे हे परदेशी लोक आपल्यासारखे नसतात. आपण समोरच्याला भेटल्यावर त्याची भाषा बघतो. हे लोक थेट डोळ्यात बघतात." तर एका संवादात मुराद म्हणतो, "आपल्या भवतालचं सत्य बघून मी माझी स्वप्न बदलत नाही. तर माझी स्वप्न बघतो आणि भवतालचं सत्य बदलण्याचा प्रयत्न करतो," असे अनेक संवाद मनाचा ठाव घेतात. यातलं रॅप वाॅर पाहतानाही अंगावर काटा येतो. रणवीरने हा सगळा माहौल कमाल उभा केला आहे.
अभिनयाबाबत रणवीर, आलिया, कल्की, विजय मौर्य यांच्यासह अमृता सुभाष, ज्योती सुभाष आदींनी फारस सुरेख कामं केली आहे. त्याला एमसी शेरही उमदा. मनात ठसणारा. मुरादच्या आईची भूमिका अमृताने वेधक साकारली आहे. सिनेमाची लांबी थोडी जास्त आहे. अडीच तासावर हा सिनेमा जातो. पण तरीही तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. म्हणूनच हा सिनेमा पाहायला हवा.
पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत चार स्टार्स. संपूर्ण मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. नव्या पिढीची भाषा, त्यांचे विचार या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसतात. पण म्हणून तो सिनेमा आपली माती सोडत नाही. या सिनेमाचं हेच यश म्हणायला हवं.
संवाद.. सप्न सत्य, डोळ्यात