Rekha Short Film : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या लघुपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी निर्मिती केलेली ‘रेखा’ (Short) ही शॉर्ट फिल्म चर्चेत आहे. या लघुपटाला ‘स्वराज्य महोत्सव’ या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट  स्त्री कलाकार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. नुकतीच रवी जाधवनं एक खास पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.  


रवी जाधव यांची पोस्ट
रवी जाधवनं रेखा या शॉर्ट फिल्मचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टला त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सांस्कृतीक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने ‘स्वराज्य महोत्सव’ या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘रेखा’ या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, मेघना जाधव निर्मित आणि शेखर रणखांबे दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार (माया पवार हिचा हा पहिलाच चित्रपट) आणि  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले. या लघुपटाची ही केवळ सुरुवात आहे. येणाऱ्या काळात ‘रेखा’हा लघुपट देश आणि परदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात आपल्या लहान शहरातील तसेच गावखेड्यातील स्रीयांचा एक महत्वाचा परंतु कधीही न चर्चीलेला प्रश्न प्रेकक्षांसमोर मांडेल अशी प्रामाणिक आशा आहे. ' 


सांगलीतल्या युवा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या या शॉर्ट फिल्मचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी या शॉर्ट फिल्मबाबत सांगितलं की, 'मी याआधी काही फिल्म बनवल्या आहेत. रेखा हा एक वेगळ्या धाटणीचा विषय आहे. मात्र ही आपल्या अवतीभवतीच्या जगाच्या मागोवा घेणारी गोष्ट आहे. उपेक्षितांचं जगणं यातून मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासन स्वराज्य महोत्सवात रेखा हा सर्वोकृष्ट लघुपट ठरला तर सर्वोकृष्ट दिग्दर्शक म्हणून शेखर रणखांबे यांना सन्मानित करण्यात आलं. तर रेखाची भूमिका साकारणारी माया पवार ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. '



शेखर रणखांबे हा सांगलीतल्या पेड गावचा एक तरुण. शेखरनं याआधी देखील अनेक चांगल्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत. यात पाम्पलेट, मढं या विशेष गाजलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: