Rekha Married Life : बॉलिवूड जगतात अफेअर, ब्रेकअप, लग्न आणि पुन्हा घटस्फोट होत असतात. काही दिवस या घटनांच्या बातम्या होतात आणि सगळं काही पूर्वपदावर येते. लव्ह मॅरेज झाल्यानंतरही बॉलिवूडमधील काही जोडप्यांचा संसार अधिक काळ चालला नाही. काही कलाकार मात्र, मागील भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करतात. बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीने एका बिझनेसमॅनसोबत विवाह केला. मात्र, सहा महिन्यातच ते वेगळे झाले.
70 च्या दशकातील बॉलिवूडमधील सौंदर्यवतीची गणना त्या काळातील आघाडीतील अभिनेत्रींमध्ये होते. एका विवाहित अभिनेत्यासोबतच्या तिच्या अफेअरच्या कहाण्या इतक्या लोकप्रिय होत्या की त्या आजही स्मरणात आहेत. पण तिने अभिनेत्याशी लग्न केले नाही तर एका मोठ्या उद्योजकाशी लग्न केले. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की लग्नानंतर लगेचच तिला तिच्या नवऱ्याबद्दल अशा विचित्र गोष्टी कळल्या की अवघ्या 6 महिन्यांनंतर ते वेगळे झाले.
लग्नानंतर समोर आला नवऱ्याचा खोटारडेपणा
ही सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे 1979 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रेखा आहे. अमिताभ सोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या चर्चा त्यावेळी सुरू होत्या. मात्र, रेखाने दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवालसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी 4 मार्च 1990 रोजी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर देवालय मंदिरात हे दोघे विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर मुकेशच्या काही गोष्टी समजल्यानंतर रेखाला धक्काच बसला. या मुद्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि खटके उडू लागले.
घटस्फोटाच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल
सर्व भांडणांना कंटाळून रेखाने मुकेश अग्रवालपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा ही बातमी मुकेशपर्यंत पोहोचली तेव्हा तो धक्का सहन करू शकला नाही आणि लग्नाच्या 6 महिन्यांनंतर त्याने अभिनेत्रीच्या दुपट्ट्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असल्याचे म्हटले जाते.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटले?
मुकेश अग्रवालने सुसाईड नोटदेखील लिहिली होती. त्यामध्ये त्याने आपल्या मुलांची देखभाल त्यांचा मानसोपचार तज्ज्ञाने करावी असे म्हटले होते. रेखाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे यासिर उस्मान यांच्यानुसार, मुकेश अग्रवाल याने आपल्या संपत्तीमधील एक पैसाही रेखाला मिळणार नसल्याचे म्हटले. रेखा स्वत:ची कमाई करण्यास समर्थ असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे मुकेशने म्हटले होते.
रेखाने संपत्तीमध्ये वाटा मागितला नाही
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार हे मुकेश अग्रवाल यांचे जवळचे मित्र होते. मुकेशच्या आत्महत्येनंतर रेखाने आपल्या दिवंगत पतीच्या मालमत्तेतून काहीही मागितले नाही, असे सांगितले होते. मुकेश अग्रवाल यांच्या भावाने असेही सांगितले होते की, जे म्हणतात की रेखाने पैशासाठी मुकेशशी लग्न केले, त्यांनी त्यांना सांगावे की रेखाने कधीही त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून काहीही मागितले नाही.