Bollywood Actor Ajay Devgan : बॉलिवूडचे (Bollywood) जग ग्लॅमर आणि सौंदर्याने भरलेले आहे. स्टारकिड्स सोडल्यास, सिनेइंडस्ट्रीत आता इतरांना आपले स्थान मिळण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. रुपेरी पडद्यावर अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून सौंदर्याची मोजमाप करणारी अदृश्य फूटपट्टी लावली जाते. या फूटपट्टी न बसणाऱ्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणं वाजवून सिनेइंडस्ट्रीत स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याचे स्वप्न पाहणारी व्यक्ती देखणी नसेल तर त्याला चित्रपट मिळणे सोपे नसते. त्याला लूकमुळे त्यालादेखील खूप ऐकावं लागतं. फिल्मी दुनियेत एक असा स्टार आहे ज्याला चित्रपटात येण्यापूर्वी त्याच्या लूकबद्दल अनेक टोमणे सहन करावे लागले. सावळ्या रंगाचा आणि सामान्य चेहऱ्याच्या या अभिनेत्या 90 च्या दशकात सिनेसृष्टी गाजवली. त्याच्या अभिनयाची जादू अजूनही कायम आहे.
मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान भक्कम
या अभिनेत्याचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला आणि आपणही बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे निर्मात्यांना दाखवून दिले. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल और कांटे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अजय देवगण (Ajay Devgan) हा आजही सिनेइंडस्ट्रीत सक्रीय असून आघाडीच्या अभिनेत्यांपैकी आहे. अजय देवगणने मिळालेल्या संधीचे सोनं करत बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केले.
लूकवरून टोमणे...
सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी अजय देवगणला आपल्या रंगरुपावरून सावळेपणावरून आणि चेहऱ्यावरून खूपच ऐकावे लागले होते. टीव्ही शो 'आपकी अदालत'मध्ये त्याने याबाबतचा किस्सा सांगितला होता. रजत शर्मा यांनी म्हटले होते की, 'मी महेश भट्ट यांचा एक लेख वाचला होता, ज्यात त्यांनी लिहिले होते की, जेव्हा तुम्ही चित्रपटसृष्टीत आलात आणि त्याआधी तुम्ही त्यात पाऊल टाकले होते, तेव्हा ट्रेडच्या पंडितांनी म्हटले होते की, असा लूक असलेला नायक कसा बनू शकतो? त्याला उत्तर देताना अजय देवगणने सांगितले की, मलाही त्यांनी याबाबत सांगितले होते. मात्र, आता जे झालं ते झालं. ते पंडित आता चुकीचे ठरले. रजत शर्मा यांनी पुढे यश जोहर यांनी देखील असे म्हटले होते की अजय हिरो कसा होऊ शकतो. नसिरुद्दीन शाह यांनीही अजयला मदत करताना चूक केल्याचे म्हटले होते. यावर उत्तर देताना अजय देवगणने म्हटले की, या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या. पण, ही मंडळी माझ्यासमोर बरेच सकारात्मक होते.
अनिल कपूरने दिला होता सल्ला
अजय देवगणचा पदार्पणातील चित्रपट 'फूल और काँटे'सोबतच अनिल कपूर आणि श्रीदेवीचा 'लम्हें'ही रिलीज झाला होता. रिलीजपूर्वी अनिल कपूरने अजयला सल्ला दिला होता की, 'फूल और कांटे' सोबत 'लम्हें' सारख्या मोठ्या चित्रपटाचा रिलीज करणे त्याला महागात पडू शकते. अजयने शोमध्ये याची कबुली दिली होती. मात्र, दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अजय आणि मधुचा 'फूल और कांटे' सुपरहिट झाला आणि 'लम्हें' फ्लॉप झाला.
अजय देवगणचे वडील वीरु देवगण हे बॉलिवूडमधील नावाजलेले स्टंट दिग्दर्शक होते. त्यांनी देखील बॉलिवूडमध्ये हिरो बनण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना अपयश आले. त्यांनी स्टंट दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी अजय देवगणला तयार केले. वीरु देवगण यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली.