Raveena Tondon Reacts On Vasai Murder Case: मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरात मंगळवारी एका प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात हत्या केली. आरोपीने मुलीच्या डोक्यावर लोखंडी पान्याने अनेक वार केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आरोपी तिच्यावर कसे वार करत आहे आणि येणारे जाणारे लोक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.


वसई प्रकरणावर रविना टंडनने काय म्हटलं?


रवीना टंडनने एक्सवर एका मीडिया संस्थेची पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'तिथे उभे असलेले सर्व लोक तिला सहज वाचवू शकले असते... ही शरमेची बाब आहे. कोणीही पुढे आले नाही हे पाहून माझे रक्त उसळलंय. कधी कधी फक्त सावध राहिले पाहिजे. त्यात कोणतीही तीक्ष्ण वस्तू नव्हती, फक्त दोन लोकांच्या धैर्याची गरज होती. असे बदमाश खरेच भित्रे असतात. कोणताही विरोध दिसताच ते पळून जातात. असे खोटे बोलणारे खोट्याच्या मागे लपतात.                                                      




ब्रेकअप, सशंय अन् हत्या...  


रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून  प्रेमसंबंध होते. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केलीये. घटना जरी वसईत घडली असली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 


मागील काही दिवसांपासून रविना टंडन


रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच रवीनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिला जमावाने घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात रवीना टंडन आपल्या ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून रवीना टंडनला क्लीन चिट देण्यात आली आहे.


ही बातमी वाचा : 


Vasai Crime : पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं? वसई हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचे संतप्त सवाल