Ratan Tata : भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं निधन झालं आहे. भारतीय उद्योग विश्वातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील चेहरा रतन टाटा भारतासाठी एक अनमोल रत्न होते. उद्योजक रतना टाटा त्यांच्या परोपकारांसाठी ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा कोट्यवधी गरजूंचा आधार होते. रतन टाटा यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावर दिग्गज व्यक्तिमत्व, राजकारणी यांच्यासह सेलिब्रिटींनीही दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूडकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली
रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेता बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, "उद्योग, परोपकार, भव्यता, मानवतेवर आणि प्राण्यांवरचे त्यांचे प्रेम. त्यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्यानंतरही ते सर्वांसाठी नेहमीच भारताचे सर्वोत्तम नागरिक असतील. ते नेहमीच आमच्या आठवणींमध्ये राहतील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रतनशा."
सलमान खान, रितेश देशमुखकडून श्रद्धांजली
सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, "रतन टाटा यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो" रितेश देशमुखने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, "असा माणूस पुन्हा होणे नाही. रतन टाटा आता आपल्यात नाहीत, याचं खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजनांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. गौरवशाली आत्म्याला शांती लाभो".
अजय देवगणने व्यक्त केला शोक
अजय देवगणने X वर लिहिलंय, "एका द्रष्ट्याच्या निधनावर जग शोक व्यक्त करत आहे. रतन टाटा यांचा वारसा पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. भारत आणि त्याही पुढे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. तुमच्या आत्म्याला शांती लाभो सर."
श्रद्धा कपूरकडूनही श्रद्धांजली
स्त्री 2 अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "सर रतन टाटा यांनी आम्हाला दाखवून दिलं की, खरं यश आपण ज्या जीवनात ज्या गोष्टींना स्पर्श करतो त्यावरून मोजलं जातं. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेरणेसाठी आणि आम्हाला दयाळूपणे नेतृत्व करण्यास शिकवल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आपण जे मागे सोडतो, त्यावरच खरा वारसा उभा राहतो. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद सर."
प्रियंका चोप्राची खास पोस्ट
अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विटमध्ये लिहिलंय, "तुमच्या दयाळूपणाने तुम्ही लाखो लोकांचं आयुष्य बदललं. तुमच्या नेतृत्वाचा आणि औदार्याचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आमच्या देशासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल तुमच्या अतुलनीय उत्कटतेबद्दल आणि समर्पणाबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात आणि सर तुमची खूप आठवण येईल."
भारताचा 'ताज' हरपला
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, "तुमच्या आत्म्याला शांती लाभो, खरा नायक". अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर दिवंगत रतन टाटा यांचा फोटो शेअर केला आणि लिहिलंय, "रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झालं. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी अखंडता आणि प्रतिष्ठेच्या मूल्यांचे समर्थन केलं आणि ते खरोखरच भारताचे प्रतीक आणि 'ताज' होते".
महत्त्वाच्या इतर बातम्या :