Ranu Mondal Birthday Special : रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन रातोरात स्टार बनलेली गायिका रानू मंडल हिचा आज 9 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळत आहे. सोशल मीडियामुळे कलाकारांना त्यांची कला सहज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं व्यासपीठ निर्माण होतं. त्यामुळे ही कलाकारमंडळी रातोरात सेलिब्रिटी होतात. अनेक लोक व्हायरल व्हिडीओमुळे स्टार बनतात आणि त्यांचं नशीब पालटतं. अशा रातोरात सेलिब्रिटी होणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे काही कलाकार अनेक वर्षांच्या मेहनत करतात, पण त्यांच्या हाती निराशा येते तर, काही कलाकार रातोरात स्टार बनतात. रातोरात स्टार होणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे गायिका रानू मंडल.
रेल्वे स्टेशनवरील व्हायरल व्हिडीओमुळे बनली स्टार
रेल्वे स्टेशनवर गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली होती. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रानू मंडलला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे तिचं नशीब एका रात्री बदललं होतं. तिच्यासाठी बॉलिवूडची दारंही खुली झाली होती. पण, त्यानंतर काही असं झालं की, तिची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. आता पुन्हा रानू मंडलवर भीख मागण्याची वेळ आली आहे.
भिकारी ते रातोरात सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास
राणू मंडलचे नशीब असं बदललं की ती रातोरात सेलिब्रिटी झाली. बॉलिवूडमध्ये तिला काम मिळालं. गायक हिमेश रेशमियाने तिला त्याच्यासोबत गाण्याची संधी दिली. पण तिचे चांगले दिवस फार काळ टिकले नाहीत आणि राणूची पुन्हा एकदा वाईट अवस्था झाली. अलिकडे व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमध्ये, रानू अत्यंत वाईट अवस्थेत दिसत असून तिला स्वतःचं गाणं देखील नीट गाता येत नव्हतं.
रानू मंडलची परिस्थिती पुन्हा जैसे थे
पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर हिंदी गाणी गाऊन भीक मागणारी रानू मंडल एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आली. रानूच्या आवाजाने प्रभावित झालेल्या संगीतप्रेमींनी तिला चांगली संधी मिळण्याच्या आशेने व्हिडीओ शेअर केला. रानू मंडलच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालेल्या, संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाने तिला बॉलिवूडमध्ये संधी दिली.
हिमेश रेशमियाने दिली बॉलिवूडमध्ये संधी
हिमेश रेशमियाने दिलेल्या पहिल्याच संधीत रानू खूप प्रसिद्ध झाली. हिमेश रेशमियाने दिलेल्या तीन गाण्यांपैकी 'आशिकी मेरी हे' गाणे ट्रेंड झालं. हे गाणेही अनेक दिवस लोकांच्या मोबाईल कॉलर ट्यून होतं. अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणारी रानू मंडल पुन्हा एकदा पडद्याआड गेली आहे. संधी नसल्यामुळे मुंबईत राहणारी रानू पुन्हा कोलकात्यात परतली आहे.
रानू मंडलच्या डोक्यात गेली प्रसिद्धीची हवा
2019 मध्ये राणू मंडलचा आवाज सर्वत्र गुंजत होता. रानू मंडलच्या बातम्या आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत होते. पण, प्रसिद्धी मिळताच रानू मंडल आपले जुने दिवस विसरली. तिने एका महिला चाहत्यासोबत गैरवर्तन केलं. मॉलमध्ये एका महिला चाहत्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून रानूला हाक मारली तेव्हा तिला राग आला. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर रानूवर खूप टीका झाली होती. रानू मंडलने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकही केला होता. रानू मंडलला तिच्या ओव्हार मेकअपमुळे ट्रोलही झाली होती.