Raju Srivastav: अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं 21 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरानं नुकत्याच एका मुलाखतीत माहिती दिली की, तिचे वडील एक महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल होते पण ते काहीच बोलत नव्हते.
काय म्हणाली अंतरा?
एका मुलाखतीत अंतरानं सांगितलं, 'मी आज मुंबईला जाणार आहे. माझ्या आईची तब्येत ठिक नाहीये. आमच्या कुटुंबासाठी हा अत्यंत कठिण काळ आहे. माझे वडील हे एक महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल होते पण ते काहीच बोलत नव्हते.' आज (25 सप्टेंबर) मुंबईमध्ये राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एका पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत अंतरानं सांगितलं, 'आम्ही लवकरच दिल्लीला जाणार आहोत. अजून काही विधी बाकी आहेत. कानपूर हे बाबांचे घर होते. त्यामुळे तिथे देखील पूजा करण्यात येणार आहे.'
राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'मी सध्या काही बोलण्याच्या स्थितीत नाहीये. मी आता तुमच्यासोबत काय बोलू? त्यांनी लढाई लढली. मला आशा वाटत होती की ते बरे होतील. मी त्यांच्यासाठी प्रर्थना करत होते. मी आता फक्त एवढंच बोलू शकते की, ते खरे योद्धा होते.' पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :