Divya Dutta Birthday : केवळ छोटा पडदाच नव्हे तर, मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हिचा आज (25 सप्टेंबर) वाढदिवस आहे. 25 सप्टेंबर 1977 रोजी लुधियानामध्ये जन्मलेली दिव्या यावर्षी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिव्या दत्ताचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते, ज्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. दिव्या ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने प्रसिद्धीचा विचार न करता प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिव्याने टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते.


मालिकांमध्ये काम करत असताना 'कसूर' या चित्रपटासाठी तिने आपला आवाजही दिला होता. दिव्या दत्ताने 'इश्क में जीना इश्क में मरना' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती 'शहीद-ए-मोहब्बत बुटा सिंह' या पंजाबी चित्रपटातून... या चित्रपटात तिने शीख पुरुषाच्या मुस्लिम पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. दरम्यान सलमान खानच्या ‘वीरगती’मधील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. यानंतर, ‘वीर झारा’ या चित्रपटातील ‘शब्बो’ या व्यक्तिरेखेतून दिव्याने केवळ प्रेक्षकच नव्हे तर, समीक्षकांची देखील वाहवा मिळवली.


बालपणापासून चित्रपटांची आवड!


दिव्याला (Divya Dutta) लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. आपल्या या अभिनयवेडाबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते. आपल्या या अभिनय प्रेमाबद्दल सांगताना दिव्या म्हणाली की, 'मी चार वर्षांची असताना मला एक दिवस वाटलं की, मी चांगला अभिनय करू शकते. त्या काळात अमिताभ बच्चन यांचा डॉन चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातील खाईके पान बनारसवाला हे गाणं खूप गाजलं होतं. या गाण्यातील अमिताभ बच्चन यांची डान्सिंग स्टाईल मला आवडली होती, त्यामुळे घरी मी या गाण्यावर खूप नाचायचे. आईचा दुपट्टा घेऊन मी तो कमरेला बांधायचे आणि ओठ लाल दिसण्यासाठी भरपूर लाल लिपस्टिक लावायचे. आमच्या घरी दिवसभर हा कार्यक्रम चालायचा’.


राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव!


अनेक जाहिराती, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिजमध्ये झळकणाऱ्या दिव्या दत्ताने (Divya Dutta) अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. अनेक चित्रपटांतील अभिनयासाठी तिला मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. 2018 मध्ये दिव्या दत्ताला 'इरादा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त दिव्या दत्ता 'स्पेशल ऑप्स' आणि 'होस्टेज 2' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 25 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!