Rajkummar Rao Networth : अभिनेता राजकुमार राव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही 'गॉडफादर' नसताना त्याने आपली मेहनत आणि अभियन कौशल्याच्या बळावर प्रसिद्धी मिळवली आहे. राजकुमार राव याने अभिनयातील विविध पैलू दाखवत प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. हेच कारण आहे की, त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आज 31 ऑगस्ट रोजी राजकुमार राव याचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याचं आयुष्य आणि आतापर्यंतच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घ्या.


अभिनेता राजकुमार रावचा खडतर प्रवास


बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार राव याचा आज 40 वा वाढदिवस आहे. राजकुमार राव सध्या स्त्री 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 15 ऑगस्ट रोजी राजकुमार राव चा स्त्री 2 चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड सुरु आहे. राजकुमार राव याची गणती बॉलिवूड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्यांमध्ये होते. पण, अनेकांना माहित नसेल की, त्याचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. 






एकेकाळी पार्ले-जी खाऊन काढले दिवस


राजकुमार राव याचा जन्म 31 ऑगस्ट 1984 मध्ये हरियाणातील  गुरुगावमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. राजकुमार रावचं खरं नाव राजकुमार यादव आहे. त्याच्या वडिलांचं नाव सत्य प्रकाश यादव आणि आईचं नाव कमलेश यादव होतं. आज ते दोघेही या जगात नाहीत. राजकुमारच्या आईचं 2017 मध्ये आणि वडिलांचं 2018 मध्ये निधन झालं.


ऑडिशनसाठी राजकुमार रावने अनेक चपला झिजवल्या


दिल्लीमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकुमार याने फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून ॲक्टिंग कोर्स केला. यानंतर तो आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत पोहोचला. यानंतर त्याने अनेक जाहिरातीमध्ये काम केलं. चित्रपटांच्या ऑडिशनसाठी राजकुमार रावने अनेक चपला झिजवल्या.


आज आहे कोट्यवधींची मालक


अनेक प्रयत्नांनंतर राजकुमार रावच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. दिग्दर्शक दिवाकर बनर्जी यांच्या 'लव, सेक्स और धोखा' चित्रपटात राजकुमार रावला संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलच नाही. राजकुमारने अनेक प्रायोगिक भूमिकांमधून आपल्या अभिनय कौशल्याची ताकद प्रेक्षकांना दाखवली आहे. चित्रपटासाठी फक्त 11 हजार रुपये फी मिळाली होती. एक काळ असा होता जेव्हा राजकुमार रावला पार्ले-जी खाऊन आणि ज्यूस पिऊन दिवस काढावे लागले होते. आज तोच राजकुमार कोट्यवधींचा मालक आहे.