चित्रपटात भरभरुन प्रेम, मात्र राजकीय पटलावर नाकारलेला थलैवा
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2017 11:11 AM (IST)
रजनीकांत यांचा राजकीय इतिहास पाहता, जनतेने त्यांना नाकारलंच आहे. अभिनेता म्हणून चाहत्यांनी त्यांना जितकं भरभरुन प्रेम दिलं, तितकंच राजकीय पटलावर त्यांना झिडकारलं गेलं.
चेन्नई : चित्रपट अभिनेत्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. करुणानिधी, एमजीआर, जयललिता, विजयकांत अशा कित्येक कलाकारांनी चित्रपटातून सुरु केलेली कारकीर्द राजकीय आखाड्यापर्यंत नेली. या यादीत आणखी दोन कलाकाराची नाव जोडलं जाणार आहेत.. एक म्हणजे थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत... आणि दुसरा कमल हासन. रजनीकांत असो वा कमल हासन... दोघांनीही अनेक वेळा राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले जवळचे संबंध पाहता, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्या राज्यात भाजपचं अस्तित्वच नाही, तिथे थलैवा भाजपला पाठिंबा कसा देणार, असा प्रश्न होता. त्यातच रजनीकांत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन अनेकांना धक्का दिला आहे.